T20 World Cup 2024 BAN vs NED Live: नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यातल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना अटीतटीचा झाला. नेदरलँड्सने शेवटपर्यंत जोर लावला, परंतु बांगलादेशने विजय खेचून आणला. या निकालामुळे बांगलादेशने सुपर ८ च्या दिशेने कूच केली आहे, तर ड गटातून ३ सामन्यांत १ गुण मिळवणाऱ्या श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले आहे. नेदरलँड्सचा शेवटचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध आहे आणि त्यांना तो मोठ्या फरकाने जिंकावा लागेल, त्याचवेळी नेपाळकडून बांगलादेशच्या पराभवाची प्रार्थना त्यांना करावी लागेल. अशा वेळी नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल.
ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट
बांगलादेशने ५ बाद १५९ धावा केल्या. शाकिब ४६ चेंडूंत ९ चौकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला. तंजिद हसन ( ३५ ) आणि शाकिब यांनी ३२ चेंडूंतील ४८ धावांची भागीदारी केली. तोवहिद हृदय ( ९) माघारी परतल्यानंतर महमुदुल्लाहने चांगली फटकेबाजी केली. महमुदुल्लाह ( २५) झेलबाद झाला आणि शाकिबसह ४१ ( ३२ चेंडू) धावांची भागीदारी संपुष्टात आली. जॅकर अलीने ७ चेंडूंत नाबाद १४ धावा केल्या. नेदरलँड्सच्या पॉव व्हेन मिकेरनने दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात उतरलेल्या नेदरलँड्सला ३२ धावांत दोन धक्के बसले. मिचेल लेव्हिट ( १८) व मॅक ओ'डोड ( १२) यांना अनुक्रमे तस्किन अहमद व तंझिम हसन यांनी माघारी पाठवले.
सायब्रँड इगलब्रेच आणि विक्रमजीत सिंग यांची ३७ धावांची भागीदारी महमुदुल्लाहने तोडली. पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात विक्रमजीत ( २६) यष्टिचीत झाला. इगलब्रेच व स्कॉट एडवर्ड यांनी आक्रमक खेळ करताना ४२ धावांची भागीदारी करून बांगलादेशला सुईच्या टोकावर उभं केलं होतं. पण, रिशाद होसेनने ही भागीदारी तोडली आणि बांगलादेशच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. इगलब्रेच २२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारांसह ३३ धावांवर झेलबाद झाला. रिहादने त्याच षटकात बॅस डी लीड ( ०) याला बाद केले, लिटन दासने चतुराईने स्टम्पिंग करून नेदरलँड्सला १११ धावांवर ५ वा धक्का दिला.
३० चेंडूंत ४९ धावा नेदरलँड्सला विजयासाठी हव्या होत्या. शाकिबने १६व्या षटकात फक्त ४ धावा देत नेदरलँड्सवर दडपण निर्माण केले. झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात स्कॉट एडवर्ड ( २५) धावांवर माघारी परतला. मुस्ताफिजूर रहमानच्या त्या षटकात १ धाव आली आणि १८ चेंडूंत ४३ धावा असा सामना त्यांच्या हातून निसटला. रिशाद होसेनने १८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लॉगन बीकला ( २) कॉट अँड बोल्ड करून सामना बांगलादेशच्या पारड्यात टाकला. रिशादने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. नेदरलँड्सला ८ बाद १३४ धावाच करता आल्या आणि बांगलादेशने २५ धावांनी सामना जिंकला.
Web Title: T20 World Cup 2024 BAN vs NED Live : Sri Lanka eliminated from 2024 T20 World Cup, Bangladesh beat Netherlands by 25 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.