BAN vs SL Live Match Updates : छोटी धावसंख्या असलेल्या सामन्यात अखेर विजय मिळवण्यात बांगलादेशला यश आले. श्रीलंकेने दिलेल्या १२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला चांगलाच संघर्ष करावा लागला. प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत कमाल करत बांगलादेशने विजय साकारला. संथ गतीने सुरू असलेल्या सामन्यात तौहीद हृदोयने वानिंदू हसरंगाला सलग तीन षटकार ठोकून रंगत आणली. पण, त्याला अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकता आले नाही आणि हसरंगाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. तो ४० धावा करून तंबूत परतला तर लिटन दासने ३६ धावा कुटल्या.
श्रीलंकेने दिलेल्या १२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला चांगलाच संघर्ष करावा लागला. अखेरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात कसाबसा बांगलादेशने विजय साकारला. बांगलादेशने २ गडी आणि ६ चेंडू राखून श्रीलंकेचा पराभव केला. यासह श्रीलंकेला ट्वेंटी-२० विश्वचषकात दुसरा पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेकडून नुवान तुषाराने सर्वाधिक (४) बळी घेऊन बांगलादेशला कडवी झुंज दिली, तर वानिंदू हसरंगा (२), धनंजय डी सिल्वा (१) आणि महीश थीक्ष्णाने (१) बळी घेतला.
तत्पुर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर पथुम निसांका वगळता श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. निसांकाने १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत ४७ धावा केल्या. त्याच्याशिवाय धनंजय डी सिल्वाने २१ धावा केल्या. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. बांगलादेशच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करताना मुस्ताफिजुर रहमान आणि रिशद हुसैन यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले.
श्रीलंकेचा संघ -वानिंदू हसरंगा (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कामिंडू मेंडिस, धनंजय डी सिल्वा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महीश थीक्ष्णा, नुवान तुषारा, मथीशा पथिराना.
बांगलादेशचा संघ -नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), तन्जीद हसन, सौम्य सरकार, लिटन दास, तौहीद हृदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्लाह, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्ताफिजुर रहमान, तन्झीम हसन शाकिब.