T20 World Cup 2024 CAN vs IRE Live : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २४ तासांच्या आत दुसरा धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. काल मध्यरात्री अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव करून सर्वांना अवाक् केले. तेच आज कॅनडाने तगड्या आयर्लंडला पराभवाचे पाणी पाजले. आयर्लंडचा हा अ गटातील दुसरा पराभव ठरल्याने त्यांचे Super 8 चे आव्हान संपुष्टात आले आहे. कॅनडाने हा विजय मिळवून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेताना पाकिस्तानला गुणतालिकेत खाली ढकलले आहे. कॅनडाचा हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला.
खराब सुरुवातीनंतर कॅनडाने चांगले पुनरागमन करताना ७ बाद १३७ धावांपर्यंत मजल मारली. कॅनडाचे ४ फलंदाज ५३ धावांवर तंबूत परतले होते, परंतु निकोलस किर्टन व श्रेयस मोव्वा यांनी ७५ धावांची भागीदारी करून कॅनडाची गाडी रुळावर आणली. किर्टन ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४९ धावांवर झेलबाद झाला. मोव्वा ३७ धावांवर रन आऊट झाला. आयर्लंडकडून क्रेग यंग व बॅरी मॅककार्थी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. अँडी बालबर्नी आणि कर्णधार पॉल स्टर्लिंग यांनी सावध सुरुवात केली होती, परंतु फलकावर २६ धावा असताना स्टर्लिंग ( ९) जेरेमी गॉर्डनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर बालबर्नी ( १७) व हॅरी टेक्टर ( २) यांना अनुक्रमे जुनैद सिद्धीकी व साद बीन जाफर या फिरकीपटूंनी माघारी पाठवले.
कॅनडाच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणातही कोणतीच कसर सोडली नव्हती. आयर्लंडला १२ चेंडूंत २८ धावा विजयासाठी हव्या होत्या. कलीम सानाने १९व्या षटकात ११ धावा दिल्याने आयर्लंडला ६ चेंडूंत १७ धावा करायच्या होत्या. गॉर्डनने २०व्या षटकात आयर्लंडची ६२ धावांची भागीदारी तोडली आणि एडर २४ चेंडूंत ३४ धावा करून माघारी परतला. ४ चेंडूंत १७ धावा आयर्लंडला हव्या होत्या आणि त्यांना ७ बाद १२५ धावांपर्यंतच पोहोचता आले. कॅनडाने १२ धावांनी सामना जिंकला. डॉक्रेल ३० धावांवर नाबाद राहिला.