T20 World Cup 2024 ENG vs AUS Live : ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडवर दणदणीत विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच दोनशेपार धावा करण्याचा पराक्रम केला. याला इंग्लंडकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले, परंतु ॲडम झम्पाने ( २-२८) दोन महत्त्वाच्या शिलेदारांना माघारी पाठवून मॅच फिरवली. ऑस्ट्रेलियाच्या अन्य गोलंदाजांनी त्यानंतर सामन्यावर मजबूत पकड घेऊन यंदाच्या स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली.
ट्रॅव्हिस हेड ( ३४) आणि डेव्हिड वॉर्नर ( ३९) या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगले झोडून काढले. या दोघांनी ५ षटकांत ७० धावा चोपल्या. कर्णधार मिचेल मार्श ( ३५) व ग्लेन मॅक्सवेल ( २८) यांनी डाव सावरला, परंतु धावांची गती मंदावली होती. टीम डेव्हिड ( ११) मोठी खेळी करण्यापासून चुकला, परंतु मार्कस स्टॉयनिस व मॅथ्यू वेड ( १६) यांची ३२ धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली. ऑस्ट्रेलियाने ७ बाद २०१ धावा केल्या आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ते प्रथमच दोनशेपार गेले. स्टॉयनिसने १७ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३० धावा केल्या.
फिल सॉल्ट व जॉस बटलर यांनी इंग्लंडला आक्रमक सुरुवात करून दिली. मिचेल स्टार्कला तिसऱ्या षटकात सॉल्टने १०६ मीटर लांब खणखणीत षटकार खेचला आणि तो या पर्वातील सर्वात लांब सिक्स ठरला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ५४ धावा केल्या. सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सॉल्टचा झेल पकडण्याची संधी ट्रॅव्हिस हेडला होती, परंतु त्याने झेल टिपला तेव्हा त्याचा पाय सीमारेषेवर लागला आणि इंग्लंडला सिक्स मिळाला. मिचेल स्टार्कच्या त्या षटकात १९ धावा इंग्लंडने चोपल्या. ॲडम झम्पाने त्याच्या पहिल्याच चेंडूवर सॉल्टचा त्रिफळा उडवून ७३ धावांची भागीदारी तोडली. सॉल्ट २३ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३७ धावांवर बाद झाला.
झम्पाच्या पुढील षटकात ४ चेंडूंत ९ धावा मिळूनही बटलरला मोह नडला. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात तो ४२ ( २८ चेंडू, ५ चौकार व २ षटकार) धावांवर पॅट कमिन्सच्या हाती झेल देऊन परतला. स्टॉयनिसने विल जॅक्सची ( १०) विकेट मिळवून दिली. १४व्या षटकात मोईन अलीने गिअर बदलला आणि ग्लेन मॅक्सवेलला ३ खणखणीत सिक्स खेचले. त्यामुळे इंग्लंडने ३६ चेंडूंत ७८ धावा असे अंतर कमी केले. दुसऱ्या बाजूने जोश हेझलवूडने १५व्या षटकात जॉनी बेअरस्टोला ( ७) संथ चेंडूवर झेल देण्यास भाग पाडले. पॅट कमिन्सने पुढच्या षटकात मोईनची ( २५) विकेट घेऊन इंग्लंडची हार पक्की केली. १६ षटकानंतर इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात ३० धावांचे अंतर होते, जे गतविजेत्यांना महागात पडले.
लिव्हिंगस्टन १५ धावांवर कमिन्सच्या गोलंदाजीवर स्टार्कला सोपा झेल देऊन परतला. इंग्लंडला २० षटकांत ६ बाद १६५ धावाच करता आल्या आणि ऑस्ट्रेलियाने ३६ धावांनी सामना जिंकला.
Web Title: T20 World Cup 2024 ENG vs AUS Live : Australia beat defending champion England, brilliant bowling by Adam Zampa, pat cummins and others
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.