T20 World Cup 2024 ENG vs AUS Live : ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगले झोडून काढले. आतापर्यंत या स्पर्धेत गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले, परंतु ऑस्ट्रेलियाच्य सलामीवीरांनी चित्र बदलले. या दोघांच्या आक्रमक सुरुवातीला अन्य फलंदाजांची तितकी स्फोटक साथ मिळाली नाही, अन्यथा इंग्लंडसमोर सव्वा दोनशेपार लक्ष्य सहज उभे राहिले असते. तरीही ऑस्ट्रेलियालने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील त्यांची सर्वोच्च धावसंख्या आज उभी करून १४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
इंग्लंडने हायव्होल्टेज सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड व डेव्हिड वॉर्नर यांनी आक्रमक सुरुवात करताना ३.४ षटकांत पन्नास धावा फलकावर चढवल्या. ५ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मोईन अलीने ७० धावांची ही भागीदारी तोडली. वॉर्नर १६ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ३९ धावांवर माघारी परतला. पुढच्याच षटकात जोफ्रा आर्चरने ऑसीचा दुसरा सलामीवीर हेडचा त्रिफळा उडवला. हेड १८ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३४ धावांवर बाद झाला. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्याने ऑस्ट्रेलियाची धावगती थोडी मंदावली होती. पण, मिचेल मार्श व ग्लेन मॅक्सवेल यांची जोडी जमली. या दोघांनी ४१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.
मागील काही सामन्यांत फॉर्मसोबत झगडणारा मॅक्सवेल चांगली फटकेबाजी करताना दिसला. मार्श ३५ धावांवर लिएम लिव्हिंगस्टनच्या चेंडूवर यष्टिचीत झाला आणि मॅक्सवेलसोबत त्याची ६५ धावांची भागीदारी तुटली. पुढच्या षटकात आदील राशीदने सेट फलंदाज मॅक्सवेलला ( २८) बाद करून ऑसींना १४१ धावांवर चौथा धक्का दिला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ग्रॅमी स्वानच्या २२ विकेट्सच्या विक्रमाशी राशीदने बरोबरी केली. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने ( ३०) ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. टीम डेव्हिड ( ११) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ख्रिस जॉर्डनला विकेट देऊन परतला.
मार्कस स्टॉयनिस व मॅथ्यू वेड ( १६) यांनी ( ३२ धावा) अखेरच्या षटकांत जोरदार फटकेबाजी करून संघाला दोनशेपार पोहोचवले. २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध १९७ ही ऑस्ट्रेलियाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम धावसंख्या होती. आज त्यांनी ७ बाद २०१ धावा करताना वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात प्रथमच दोनशेपार धावा उभ्या केल्या. स्टॉयनिस १७ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३० धावांवर झेलबाद झाला. जॉर्डनची ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही शंभरावी विकेट ठरली.
Web Title: T20 World Cup 2024 ENG vs AUS Live : Australia's highest run in a World Cup, 14 years old record broken, England need 202 runs to win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.