Join us  

'करा किंवा मरा'च्या सामन्यात इंग्लंडचा 'मोठ्ठा' विजय; अवघ्या १९ चेंडूत सामना जिंकला

ENG vs Oman Match Updates : इंग्लंडने ओमानचा दारूण पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 6:45 AM

Open in App

T20 World Cup 2024, ENG vs Oman : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी गतविजेत्या इंग्लंडच्या संघाला कोणत्याही परिस्थितीत ओमानचा पराभव करणे गरजेचे होते. कारण इंग्लिश संघाला पहिल्या दोन सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आला नाही. यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. पण, शुक्रवारी झालेल्या सामन्यात इंग्लिश संघाने नवख्या ओमानचा दारूण पराभव करून मोठा विजय साकारला. यासह त्यांनी नेटरनरेटमध्ये चांगली सुधारणा केली आहे. 

इंग्लंडचा संघ ब गटात असून, या गटातून सुपर-८ मध्ये प्रवेश करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे. आता स्कॉटलंड आणि इंग्लंड यांच्यात सुपर-८ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चुरस आहे. इंग्लंडचे तीन सामन्यांत ३ तर स्कॉटलंडचे तीन सामन्यांत ५ गुण आहेत. दोन्हीही संघांनी आपला अखेरचा सामना जिंकल्यास स्कॉटलंडला सुपर-८ चे तिकीट मिळेल. पण, इंग्लंडला सुपर-८ साठी पात्र होण्यासाठी साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकावा लागेल. याशिवाय स्कॉटलंडच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल.

ओमानविरूद्ध मोठा विजयओमानविरूद्धच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवख्या संघाला अवघ्या ४७ धावांत गारद करण्यात इंग्लंडला यश आले. ओमानकडून एकही फलंदाज ११ हून अधिक धावा करू शकला नाही. अखेर त्यांचा संघ १३.२ षटकांत अवघ्या ४७ धावांत सर्वबाद झाला. इंग्लंडकडून आदिल राशिदने सर्वाधिक (४) बळी घेतले, तर जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड यांना प्रत्येकी ३-३ बळी घेण्यात यश आले.

ओमानने दिलेल्या ४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने मोठा विजय मिळवला. अवघ्या ३.१ षटकांत ५० धावा करून इंग्लिश संघाने विजयाचे खाते उघडले. त्यांनी ३.१ षटकांत २ बाद ५० धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ८ चेंडूत नाबाद २४ धावा कुटल्या.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024इंग्लंडजोस बटलर