T20 World Cup 2024 ENG vs SA Live Marathi : क्विंटन डी कॉकने फटकेबाजी करूनही दक्षिण आफ्रिकेच्या अन्य फलंदाजांनी नियमित विकेट फेकल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांना सामन्यात पुनरागमन करण्याची आफ्रिकेने संधी दिली. आफ्रिकेच्या मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश हे, या संपूर्ण स्पर्धेत डोकेदुखीचं कारण ठरलेलं आहे. पुन्हा एकदा डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून संघाला सन्मानजनक धावापर्यंत पोहोचवले.
इंग्लंडने सुपर ८च्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील सामन्यात फॉर्म गवसलेल्या क्विंटन डी कॉकने इंग्लिश गोलंदाजांना हैराण केले. जोफ्रा आर्चरने चौथ्या षटकात वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकून पाहिले, परंतु क्विंटनने ६,६,४ असे उत्तुंग फटके खेचले. त्यानंतर रिझा हेंड्रीक्सनेही ( १९) हात मोकळे करताना त्या षटकात एकूण २१ धावा मिळवल्या. आफ्रिकेने पॉवर प्लेमध्ये ६३ धावा केल्या. क्विंटनने २२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. ५८ धावांवर मार्क वूडने त्याचा झेल पकडला होता, परंतु चेंडूचा जमिनीला स्पर्श झाल्याने अम्पायरला निर्णय बदलावा लागला.