T20 World Cup 2024 ENG vs SA Live Marathi : गतविजेत्या इंग्लंडला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ गटातील दुसऱ्या सामन्यात विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली. २०व्या षटकात एडन मार्करमने घेतलेला परतीला झेल सामन्याला कटालणी देणारा ठरला. इंग्लंडला विजयासाठी १८ चेंडूंत २५ धावांची गरज असताना कागिसो रबाडाने सेट फलंदाज लिएम लिव्हिंगस्टोनला माघारी पाठवून हॅरी ब्रूकसोबतची ७८ धावांची भागीदारी तोडली. त्यानंतर मार्को यानसेन व एनरिच नॉर्खियाने अखेरच्या दोन षटकांत सामना खेचून आणला.
क्विंटन डी कॉकने ३८ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह ६५ धावा केल्या. क्विंटन व रिझा हेंड्रिक्स ( १९) यांनी पहिल्या विकेटसाठी ९.५ षटकांत ८६ धावा जोडल्या. सहा धावानंतर क्विंटन माघारी परतला आणि इंग्लंडच्या गोलंदाजांना पुनरागमन करण्याची संधी मिळाली. हेनरिच क्लासेन ( ८) दुर्देवीरित्या रन आऊट झाला. कर्णधार एडन मार्करम ( १) हाही आदिल राशीदच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. डेव्हिड मिलर खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याने २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४३ धावांची खेळी केली. जोफ्रा आर्चरने २०व्या षटकात मिलरसह दोन धक्के दिले. त्रिस्तान स्तब्सने नाबाद १२ धावा केल्या आणि आफ्रिकेने ६ बाद १६३ धावांपर्यंत मजल मारली.
प्रत्युत्तरात कागिसो रबाडाने दुसऱ्या षटकात फिल सॉल्टला ( ११) माघारी पाठवले. रिझा हेंड्रिक्सने कव्हर्सवर अफलातून झेल घेतला. जॉनी बेअरस्टो १६ धावांवर केशव महाराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. महाराजने त्याच्या पुढच्या षटकात जॉस बटलरची ( १७) विकेट घेऊन इंग्लंडला मोठा धक्का दिला. ऑटनेल बार्टमनने ११व्या षटकात मोईन अलीला ( ९) माघारी पाठवले. हॅरी ब्रूक व लिएम लिव्हिंगस्टन यांनी इंग्लंडचा किल्ला लढवताना पाचव्या विकेटसाठी ३० चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. इंग्लंडला ३० चेंडूंत ५९ धावा हव्या होत्या.