T20 World Cup 2024 : इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे धुवून निघाला. सामना रद्द झाला पण यामुळे इंग्लिश चाहत्यांना सुखद धक्का बसला. दोन्हीही संघाना १-१ गुण देण्यात आले. खरे तर सामन्याच्या पूर्वसंध्येला देखील पाऊस झाला. मग कशीबशी नाणेफेक झाली. जोस बटलरने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने इंग्लिश गोलंदाजांना घाम फोडला. सलामीवीर जॉर्ज मुशी आणि मायकल जोन्स यांनी स्फोटक खेळी केली.
पावसाची ये-जा सुरूच राहिल्याने सामना १०-१० षटकांचा खेळवला गेला. स्कॉटलंडने निर्धारित १० षटकांत ९० धावा केल्या. पण इंग्लंडच्या संघाला धावांचा पाठलाग करण्याची संधी मिळाली नाही. स्कॉटलंडकडून जोन्स व मुन्से या दोघांनी १० षटकांत संघाला बिनबाद ९० धावांपर्यंत पोहोचवले. मुन्से ३१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४१, तर जोन्स ३० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला. DLS नुसार गतविजेत्या इंग्लंडसमोर विजयासाठी ६० चेंडूंत १०९ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. पावसाच्या आगमनाने इंग्लंडची धाकधुक पुन्हा वाढवली होती. अखेरीस हा सामना रद्द करावा लागला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुणावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, हा सामना रद्द झाल्यानंतर नामिबिया २ गुणांसह ब गटात अव्वल स्थानावर आहे. तर इंग्लंड आणि स्कॉटलंड हे संघ प्रत्येकी १-१ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. या गटात ऑस्ट्रेलिया चौथ्या आणि ओमान पाचव्या स्थानावर आहे. स्कॉटलंड आणि इंग्लंड हा सामना रद्द झाल्याने इंग्लिश संघाला फायदा झाल्याचे बोलले जात आहे. कारण त्यांना १० षटकांत विजयासाठी ११० धावांची आवश्यकता होती. सामन्यात पावसाचा व्यत्यय सुरू होता. त्यामुळे सामना पार पडला असताच तर स्कॉटलंडच्या गोलंदाजांना मदत झाली असती.