T20 World Cup 2024, ENG vs SCOT : गतविजेत्या इंग्लंडची युरोपियन संघाविरुद्ध ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयाची पाटी कोरीच राहिली. इंग्लंड व स्कॉटलंड यांच्यात प्रथमच ट्वेंटी-२० मॅच खेळली गेली. इंग्लंडला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एकदाही युरोपियन संघांविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. आयर्लंडविरुद्ध २ सामन्यांत इंग्लंडला १ सामन्यात हार मानावी लागली, तर १ सामना अनिर्णित राहिला. नेदरलँड्सने २ सामन्यांत इंग्लंडला पराभूत केले आहे. आजही त्यांच्या नशीबी विजय नव्हता.
स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉर्ज मुन्से आणि मिचेल जोन्स यांनी स्कॉटलंडला चांगली सुरुवात करून दिली होती. मार्क वूडने पाचव्या षटकात मुन्सेला ( १६) झेलबाद केले, परंतु नो बॉल ठरल्याने इंग्लंडच्या हातची विकेट गेली. ६.२ षटकांत स्कॉटलंडने एकही विकेट न गमावता ५१ धावा केल्या. पावसाच्या हजेरीमुळे पुन्हा सामना थांबवला गेला. ११.३० वाजता सामना पुन्हा सुरू झाला आणि १० षटकं खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. मुन्सेने आठव्या षटकात आदील राशीदच्या २ चेंडूंत खणखणीत स्विच हिट खेचल्या. मुन्सीने त्या षटकात १८ धावा कुटल्या.
जोन्स व मुन्से या दोघांनी १० षटकांत संघाला बिनबाद ९० धावांपर्यंत पोहोचवले. मुन्से ३१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४१, तर जोन्स ३० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४५ धावांवर नाबाद राहिला. DLS नुसार गतविजेत्या इंग्लंडसमोर विजयासाठी ६० चेंडूंत १०९ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवले गेले. पावसाच्या एन्ट्रीने इंग्लंडची धाकधुक पुन्हा वाढवली होती. अखेरीस हा सामना रद्द करावा लागला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुणावर समाधान मानावे लागले.