T20 World Cup 2024 ENG vs UAE Live : इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८च्या त्यांच्या शेवटच्या लढतीत अमेरिकेवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा नेट रन रेट हा ०.४१२ असा होता आणि वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका त्यांच्या पुढे होते. आता इंग्लंडने ४ गुणही कमावले आणि नेट रन रेटच्या (१.९९२ ) जोरावर उपांत्य फेरीतील स्थानही पक्के केले. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात उद्या होणारा सामना महत्त्वाचा असेल. आफ्रिका जरी ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असली तरी यजमान विंडीज ( २) विजयासह नेट रन रेट सुधारून उपांत्य फेरीत जाऊ शकतात.
इंग्लंडने अमेरिकेला ११५ धावांवर ऑल आऊट केले. आदिल राशिदने फिरकीचा चांगला मारा केला. ख्रिस जॉर्डनने ( HAT-TRICK FOR CHRIS JORDAN) हॅटट्रिक घेतली. अमेरिकेचे सलामीवीर स्टीव्हन टेलर ( १२ ) व एँड्रीएस गौस ( ८) यांना ४३ धावांवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. नितीश कुमार ( ३०) आणि कर्णधार आरोन जॉन्स ( १०) यांना आदिल राशिदने त्रिफळाचीत केले. राशिदने ४-०-१३-२ अशी अप्रतिम स्पेल टाकली. हरमीत सिंग ( २१) याने चांगली फटकेबाजी करून कोरी अँडरसनला ( १९) साथ दिली. ख्रिस जॉर्डनने १९व्या षटकात हॅटट्रिक घेताना अमेरिकेचा संपूर्ण संघ ११५ धावांत तंबूत पाठवला. जॉर्डनने २.५-०-१०-४ अशी स्पेल टाकली. सॅम कुरनने दोन विकेट्स घेतल्या. अमेरिकेने ६ चेंडूंत ५ विकेट्स गमावल्या.