मेघना ढोके (संपादक, लोकमतसखी.कॉम)
विश्वचषक जिंकला, मुंबईत विजयोत्सव झाला. अनेकजण अजूनही अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल पुन:पुन्हा पाहत आहेत. ‘तो झेल सुटला असता तर कप सुटला असता,’ म्हणत आहेत, जे खरंही आहे. विधिमंडळात झालेल्या सत्कारावेळी सूर्यकुमार प्रांजळपणे म्हणाला, ‘चेंडू हातात बसला.’ त्याआधीही एका सामन्यात अक्षर पटेलने एका हातात टिपलेला झेलही असाच अचाट होता. भारतीय फिल्डिंग इतकी जबरदस्त की, त्या जोरावर मोक्याच्या क्षणी सामने फिरावेत, हे म्हटलं तर नवलच! पण ते नवल नव्हतं. त्यामागे होते टी. दिलीप नावाचे एक हसरे, साधेसेच, पण कठोर शिस्तीत बोलणारे सर.
वर्ल्ड कपचा थरार जितका अनोखा, तितकीच भन्नाट ठरली फिल्डिंग मेडल सेरेमनीची गोष्ट. फिल्डिंग मेडल सेरेमनीचा व्हिडीओ इंडियन टीम समाजमाध्यमांत शेअर करत असे. काही मिनिटांचा हा व्हिडीओ म्हणजे भारतीय ड्रेसिंग रूममध्ये डोकावण्याची संधीच. टीममधल्या प्रत्येकाचं टोकाचं परफेक्शन, ऊर्जा आणि आपल्या क्षमतेपलीकडे जाऊन करण्याचे प्रयत्न काय असतात, याची एक झलक त्या व्हिडीओत दिसे. एकाच ध्येयासाठी आसुसलेली, 'मी'पण वगळून 'आम्ही' म्हणत एकमेकांना प्रोत्साहन देणारी आनंदी माणसं कशी दिसतात, याचं सुखद दर्शन या व्हिडीओतून होत असे. खरं तर २०२३ वन डे वर्ल्ड कपमध्येच या फिल्डिंग मेडल परंपरेची सुरुवात झाली, त्याही मालिकेत कुणी उत्कृष्ट झेल घेतला की थेट मैदानातूच अनेकजण फिल्डिंग कोच टी. दिलीप यांना इशारे करत आपली मेडलवर दावेदारी सांगत. त्या परंपरेनं टी २० विश्वचषकात पुढचं पाऊल टाकलं.
महेंद्रसिंग धोनी कप्तान असताना नेहमी म्हणत असे, की एखादा दिवस असा उजाडतो की, उत्तम बॅटरही लवकर आऊट होतो, उत्तम बॉलरही पिटला जातो. पण, उत्तम फिल्डर प्रत्येक सामन्यात धावा वाचवतो, कॅच घेतो, सामना फिरवू शकतो.
पण या वर्ल्ड कपमध्ये आणि गेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही हे चित्र बदललेलं दिसलं. त्याचं श्रेय जातं टी. दिलीप या फिल्डिंग कोचना.
यावेळी अंतिम सामन्यात, अंतिम क्षणी सूर्यकुमारने घेतलेला झेल अनेकांना चकित करून गेला; पण फिल्डिंग कोच दिलीप नंतर म्हणाले की, ‘असे अवघड कॅच घ्यायचा सराव आम्ही किमान पन्नास वेळा तरी केला होता. अर्थात, तरी त्या प्रेशरमध्ये सूर्यकुमारने तो कॅच घेतला, हे विशेष आहेच.’
..तर म्हणून ही गोष्ट त्या बेस्ट फिल्डर ऊर्फ फिल्डिंग मेडल सेरेमनीची.
मॅच संपली की या सोहळ्यात पदक द्यायला नवीन पाहुणा यायचा. सचिन तेंडुलकर, सर व्हिव्हियन रिचर्ड्स, रवी शास्त्री, राहुल द्रविड आणि दिनेश कार्तिक यांच्या हस्ते मेडल देण्यात आलं. एकदा तर दिलीप सरांसह काम करणाऱ्या असिस्टंट फिल्डिंग कोचच्या हस्ते दिलेल्या मेडलचंही संघाला अप्रुपच वाटलं होतं. दिनेश कार्तिक तर म्हणालाही की, ‘इतक्या मोठ्या लोकांना आजवर बोलावलं की आता फक्त युएफो आणि एलियनच यायचे बाकी आहेत!’ त्यातला विनोद सोडला तरी हे मेडल मिळणं टीममध्ये प्रत्येकासाठी प्रतिष्ठेचा विषय झाला होता.
मेडल प्रदान करण्यापूर्वी दिलीप सर सांगत की, आपण एकट्यानं लहानसं यश मिळवू शकतो; पण सगळ्यांनी मिळून खूप मोठं यश मिळेल. त्यांच्या बोलण्यात ॲग्रेसिव्ह, हॉट स्पॉट, को-आर्डिनेशन हे शब्द सतत येत. क्षणात प्रतिक्रिया देत कॅच टिपण्याची, धाव अडवण्याची कला ते सांगत.
सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांना यावेळी पदक मिळालं. प्रत्येक सामान्यानंतरचा प्रत्येक व्हिडीओ हे एखादं मॅनेजमेंट लेसन वर्कशॉप असावे इतका नेमका होता.
..त्यानिमित्तानं चर्चेत आहेत भारतीय संघाचे फिल्डिंग कोच टी दिलीप.खरं तर फक्त क्रिकेटच नाही, तर भारतीय क्रीडाविश्वातच कुणीही प्रशिक्षक असला तरी आजवर एक प्रश्न थेट किंवा आडून-आडून विचारला जातोच? ‘कितना खेला है?’ म्हणजेच जो माणूस आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलाच नाही तो काय इतरांना 'ग्यान' देणार, त्याचा काय आदर करायचा, अशी एक कोती वृत्ती सर्वत्र आहे. म्हणूनच, या दोन्ही विश्वचषकांतील हा बदल नोंदवून ठेवायला हवा.
दिलीप यांचा आदर करणारे, त्यांना ‘सर’ म्हणणारे संघातील अनेक खेळाडू स्वत: विश्वविक्रमी बहाद्दर आहेत. दिलीप स्वत: फर्स्ट क्लास क्रिकेटही खेळलेले नाहीत. दिलीप स्वत: अत्यंत क्रिकेटवेडे; पण त्यांच्या कुटुंबाचा काही त्यांना म्हणावा तसा पाठिंबा नव्हता, योग्यवेळी संधीही मिळाली नाही. पुरेसं प्रशिक्षणही नाही. मात्र क्रिकेट प्रशिक्षक म्हणून एकेक परीक्षा देत ते पुढे सरकत राहिले. नॅशनल क्रिकेट अकॅडमीत आर. श्रीधर यांचे ते असिस्टंट होते. तिथे त्यांनी तरुण खेळाडूंच्या फिल्डिंगमध्ये उत्तम सुधार घडवून आणला. त्यांच्याचकडे त्या काळात शुभमन गिल, तिलक वर्मासारखे खेळाडू तयार झाले. द्रविड यांनी त्यांना इंडिया ए संघासाठीही संधी दिली. पुढे श्रीधर निवृत्त झाल्यावर दिलीप भारतीय संघाचे फिल्डिंग कोच झाले. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी हा पायंडा पाडला की संघात प्रत्येक माणसाचा आणि त्याच्या योगदानाचा आदर झालाच पाहिजे. त्यातून ही टीम बांधली गेली.
एका मेडल सेरेमनीत दिलीप म्हणालेही, ‘प्रत्येक खेळाडूची ताकद ही संघाची ताकद असते आणि संघाची ताकद ही प्रत्येक खेळाडूची ताकद ठरते.’ खरं तर दिलीप हे काही फार मोठे वक्ते नाहीत की, मोटिव्हेशनल स्पीकर नाहीत. ते बोलतातही मोजकं. मात्र संघातली एकी आणि फिल्डिंग ही क्रिकेटमधली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे हे त्यांनी अधोरेखित केलं.
... आणि हे सारे घडवून आणले फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळळेल्या एका क्रिकेटवेड्याने.
टी दिलीप.
सूर्यकुमारचा कॅच लक्षात ठेवताना त्याच्यामागे असलेले टी. दिलीपही लक्षात ठेवायला हवेत
Web Title: t20 world cup 2024: Fielding medal and Fielding coach T. Dilip, story of a new aggressive and competitive fielding approach, Intensity in fielding. .
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.