मेघना ढोके (संपादक, लोकमतसखी.कॉम)विश्वचषक जिंकला, मुंबईत विजयोत्सव झाला. अनेकजण अजूनही अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल पुन:पुन्हा पाहत आहेत. ‘तो झेल सुटला असता तर कप सुटला असता,’ म्हणत आहेत, जे खरंही आहे. विधिमंडळात झालेल्या सत्कारावेळी सूर्यकुमार प्रांजळपणे म्हणाला, ‘चेंडू हातात बसला.’ त्याआधीही एका सामन्यात अक्षर पटेलने एका हातात टिपलेला झेलही असाच अचाट होता. भारतीय फिल्डिंग इतकी जबरदस्त की, त्या जोरावर मोक्याच्या क्षणी सामने फिरावेत, हे म्हटलं तर नवलच! पण ते नवल नव्हतं. त्यामागे होते टी. दिलीप नावाचे एक हसरे, साधेसेच, पण कठोर शिस्तीत बोलणारे सर.
वर्ल्ड कपचा थरार जितका अनोखा, तितकीच भन्नाट ठरली फिल्डिंग मेडल सेरेमनीची गोष्ट. फिल्डिंग मेडल सेरेमनीचा व्हिडीओ इंडियन टीम समाजमाध्यमांत शेअर करत असे. काही मिनिटांचा हा व्हिडीओ म्हणजे भारतीय ड्रेसिंग रूममध्ये डोकावण्याची संधीच. टीममधल्या प्रत्येकाचं टोकाचं परफेक्शन, ऊर्जा आणि आपल्या क्षमतेपलीकडे जाऊन करण्याचे प्रयत्न काय असतात, याची एक झलक त्या व्हिडीओत दिसे. एकाच ध्येयासाठी आसुसलेली, 'मी'पण वगळून 'आम्ही' म्हणत एकमेकांना प्रोत्साहन देणारी आनंदी माणसं कशी दिसतात, याचं सुखद दर्शन या व्हिडीओतून होत असे. खरं तर २०२३ वन डे वर्ल्ड कपमध्येच या फिल्डिंग मेडल परंपरेची सुरुवात झाली, त्याही मालिकेत कुणी उत्कृष्ट झेल घेतला की थेट मैदानातूच अनेकजण फिल्डिंग कोच टी. दिलीप यांना इशारे करत आपली मेडलवर दावेदारी सांगत. त्या परंपरेनं टी २० विश्वचषकात पुढचं पाऊल टाकलं.
महेंद्रसिंग धोनी कप्तान असताना नेहमी म्हणत असे, की एखादा दिवस असा उजाडतो की, उत्तम बॅटरही लवकर आऊट होतो, उत्तम बॉलरही पिटला जातो. पण, उत्तम फिल्डर प्रत्येक सामन्यात धावा वाचवतो, कॅच घेतो, सामना फिरवू शकतो.पण या वर्ल्ड कपमध्ये आणि गेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही हे चित्र बदललेलं दिसलं. त्याचं श्रेय जातं टी. दिलीप या फिल्डिंग कोचना.यावेळी अंतिम सामन्यात, अंतिम क्षणी सूर्यकुमारने घेतलेला झेल अनेकांना चकित करून गेला; पण फिल्डिंग कोच दिलीप नंतर म्हणाले की, ‘असे अवघड कॅच घ्यायचा सराव आम्ही किमान पन्नास वेळा तरी केला होता. अर्थात, तरी त्या प्रेशरमध्ये सूर्यकुमारने तो कॅच घेतला, हे विशेष आहेच.’
एका मेडल सेरेमनीत दिलीप म्हणालेही, ‘प्रत्येक खेळाडूची ताकद ही संघाची ताकद असते आणि संघाची ताकद ही प्रत्येक खेळाडूची ताकद ठरते.’ खरं तर दिलीप हे काही फार मोठे वक्ते नाहीत की, मोटिव्हेशनल स्पीकर नाहीत. ते बोलतातही मोजकं. मात्र संघातली एकी आणि फिल्डिंग ही क्रिकेटमधली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे हे त्यांनी अधोरेखित केलं.... आणि हे सारे घडवून आणले फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळळेल्या एका क्रिकेटवेड्याने.टी दिलीप.सूर्यकुमारचा कॅच लक्षात ठेवताना त्याच्यामागे असलेले टी. दिलीपही लक्षात ठेवायला हवेत