Hardik Pandya And Krunal Pandya : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकून भारतीय संघाने तमाम भारतीयांची इच्छा पूर्ण केली. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टीम इंडियाने जग जिंकले. भारताच्या या विजयात अष्टपैलू हार्दिक पांड्याचे मोठे योगदान आहे. अंतिम सामन्यात पांड्याने घातक वाटणाऱ्या हेनरिक क्लासेनला बाद करून भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला. अखेरच्या षटकांत १६ धावांचा बचाव करताना पांड्याने डेव्हिड मिलर आणि कगिसो रबाडा यांना बाद केले. यासह भारताने चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. खरे तर मागील काही कालावधीपासून हार्दिकला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. याचाच दाखला देत त्याचा भाऊ कृणाल पांड्याने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. (Krunal Pens Down Note For Hardik Pandya)
कृणाल पांड्याने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, हार्दिक आणि मी व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरुवात करून जवळपास एक दशक पूर्ण झाले आहे. मागील काही दिवस एखाद्या स्टोरीसारखे होते. ज्याचे आपण स्वप्न पाहिले होते ते अखेर सत्यात उतरले आहे. प्रत्येक देशवासीयांप्रमाणे मी देखील या क्षणाचा आनंद घेत आहे. मी माझ्या भावाकडे पाहून खूप भावुक झालो आहे. हार्दिकसाठी गेले सहा महिने सर्वात कठीण गेले आहेत. त्याच्यासोबत खूप वाईट झाले. तो केवळ याच्यासाठी पात्र नव्हता हे मला कळते. म्हणूनच एक भाऊ म्हणून मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटले. त्याने या काळात खूप काही सहन केले. शेवटी तो देखील एक माणूस आहे त्यालाही भावना आहेत.
"हार्दिक कसा तरी हसत हसत या सगळ्यातून बाहेर पडला, तरीही मला माहित आहे की त्याला हसणे किती कठीण होते. तो कठोर परिश्रम करत राहिला आणि विश्वचषक मिळविण्यासाठी त्याला काय करावे लागेल यावर लक्ष केंद्रित केले कारण ते त्याचे अंतिम उद्दिष्ट होते. भारताचे दीर्घकाळचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने खूप चांगली कामगिरी केली. त्याच्यासाठी यापेक्षा मोठे काहीच नाही. वयाच्या ६ व्या वर्षापासून देशासाठी खेळणे आणि विश्वचषक जिंकणे हे स्वप्न होते", असेही कृणाल पांड्याने पोस्टच्या माध्यमातून म्हटले.
तसेच मी फक्त लोकांना आठवण करून देऊ इच्छितो की हार्दिकने त्याच्या कारकिर्दीत इतक्या कमी कालावधीत जे केले ते अविश्वसनीय आहे. राष्ट्रीय संघासाठी त्याने खूप काही केले. प्रत्येक वेळी, हार्दिकच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, लोकांनी त्याला हिणवले आहे आणि यानेच त्याला आणखी मजबूत केले. हार्दिकने नेहमीच सर्वप्रथम देशाचा विचार केला. बडोद्याहून आलेल्या एका लहान मुलासाठी आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मदत करण्यापेक्षा मोठी कामगिरी असू शकत नाही. हार्दिक, मला तुझा खूप अभिमान आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू प्रत्येक आनंदासाठी आणि तुझ्या मार्गावर येणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहेस. माय बच्चू, मला तुझ्याबद्दल खूप आदर आहे, अशा शब्दांत कृणाल पांड्याने त्याच्या भावाच्या खेळीला दाद दिली.