Wasim Akram On Pakistan Team : पाकिस्तान ट्वेंटी-२० विश्वचषकातून बाहेर होताच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. सातत्याने शेजारील संघाला साखळी फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे माजी खेळाडूंसह चाहते बाबर आझमच्या संघावर रोष व्यक्त करत आहेत. पाकिस्तानने तीनपैकी केवळ एक सामना जिंकला आहे. त्यामुळे रविवारी होणारा पाकिस्तान-आयर्लंड हा सामना म्हणजे केवळ औपचारिकता असेल. पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी खेळाडू वसीम अक्रमने संपूर्ण संघ बदलण्याचा सल्ला पीसीबीला दिला आहे.
खरे तर पावसाने पाकिस्तानला बुडवल्याने शेजाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून पाकिस्तान संघाचे पॅकअप निश्चित झाले. अमेरिका आणि भारताविरुद्धचा पराभव त्यांच्यासाठी घात करणारा ठरला. अ गटातून भारताने सुपर ८ चे तिकिट पक्के केले होते आणि दुसऱ्या स्थानासाठी अमेरिका आघाडीवर होते. अमेरिका विरुद्ध आयर्लंड लढतीवर पाकिस्तानचे नशीब अवलंबून होते, परंतु त्यांना ती साथ मिळाली नाही. हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने अमेरिका व आयर्लंडला प्रत्येकी १-१ गुण मिळाला आणि यजमानांनी ५ गुणांसह सुपर ८ मधील आपली जागा पक्की केली.
पाकिस्तानचा संपूर्ण संघ बदला - अक्रम
अक्रम म्हणाला की, पाकिस्तानच्या खेळाडूंना वाटते की, त्यांनी चांगली कामगिरी केली नाही तर प्रशिक्षकांची उचलबांगडी केली जाईल. अशाने त्यांना संघातून बाहेर जाण्याची भीती वाटत नाही. पण, यावेळी सर्वकाही विरूद्ध करायला हवे. कारण प्रशिक्षक तेच ठेवून संपूर्ण संघ बदलण्याची गरज आहे. वसीम अक्रम सामन्यांचे विश्लेषण करताना बोलत होता.
दरम्यान, पावसामुळे अमेरिका-आयर्लंड सामना उशीरा सुरू झाला. १० वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणीच सुरू होती आणि रेफरींनी ११.४६ वाजता मॅच सुरू होणार असल्याचे जाहीर केले. पावसामुळे विलंब झाल्याने ही लढत ५-५ षटकांची खेळवण्यात येणार होती. ११ वाजता खेळपट्टीची पाहणी करताना काही मैदानावरील काही ओल्या पृष्ठभागावर सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तितक्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आणि वीजांचा कडकडाटही झाला. त्यामुळे पुन्हा खेळपट्टी झाकण्यात आली. सामनाधिकारी जवागल श्रीनाथने सामना रद्द झाल्याचे जाहीर केले आणि पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम झाला.
Web Title: t20 world cup 2024 former cricketer wasim Akram angry on pakistan's players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.