T20 World Cup 2024 : रविवारपासून ट्वेंटी-२० विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. सलामीच्या सामन्यात यजमान अमेरिका आणि कॅनडा हे संघ भिडले. भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग या स्पर्धेचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. सिक्सर किंग न्यूयॉर्कमधील ऑक्युलस ट्रेड सेंटर येथे फॅन पार्कच्या उद्घाटनप्रसंगी दिसला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना युवराजने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. "मी अमेरिकेतील लोकांना क्रिकेट पाहायला सांगेन. टीम इंडियाचा विजय हा सर्वात महत्त्वाचा क्षण असेल. कारण भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकून खूप दिवस झाले आहेत. त्यामुळे मला आशा आहे की, भारताचे शिलेदार त्यांचे काम चोख पार पाडतील. क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यास या स्पर्धेमुळे खूप मदत होईल", असे युवराजने सांगितले.
तसेच मला आशा आहे की, भारत नक्कीच अंतिम सामना खेळेल. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान देखील कदाचित फायनलमध्ये पोहोचू शकतात. पण ऑस्ट्रेलिया अंतिम फेरी गाठेल असे वाटत नाही. मी भारत आणि पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आतुर आहे. मी पाकिस्तानविरूद्ध क्रिकेट खेळलो आहे पण खेळण्यापेक्षा पाहताना खूप तणाव येतो. इतिहासामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत प्रेक्षणीय ठरते. अमेरिकेत क्रिकेटची चांगली वाढ होत आहे, असेही युवराज सिंगने नमूद केले.
युवराज आणखी म्हणाला की, मी आज इथे आहे, इथे आणल्याबद्दल आयसीसीचे आभार. हे एक प्रतिष्ठित ठिकाण आहे. या ठिकाणाचा एक वेगळा इतिहास आहे. अमेरिकेने हे ठिकाण कसे परत आणले आणि ते कसे बनवले, ते कधीही विसरू शकत नाही. किंबहुना याचा कोणालाच विसर पडणार नाही. भारतीय या ठिकाणाची कदर करतील. मी लोकांना येण्यास सांगेन. तसे पाहिल्यास अमेरिकेत सर्वच खेळ लोकप्रिय आहेत. आपल्याकडे भारत-पाकिस्तानचा सामना भावनांचा असतो. जर आपण जिंकलो तर आपला आनंद गगनात मावत नाही. मागील काही वर्षांपासून भारताचा विक्रम चांगला राहिला आहे आणि तो कायम राहील.
दरम्यान, ९ जून रोजी न्यूयॉर्क येथे कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. भारत ५ तारखेला आयर्लंडविरूद्धच्या सामन्याने आपल्या विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात करेल. तर पाकिस्तानचा सलामीचा सामना यजमान अमेरिकेसोबत होणार आहे.