Haris Rauf fight with fan viral video: T20 World Cup 2024 स्पर्धेत पाकिस्तानी संघाची फार वाईट अवस्था झाली. सुरुवातीला पाकिस्तानचा अमेरिकेने पराभव केला. पाठोपाठ भारतानेही त्यांना पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानने आयर्लंड आणि कॅनडाविरोधात विजय मिळवला पण तरीही त्यांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे पाकिस्तानी खेळाडूंना आता चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याचे या मुद्द्यावरून एका पाकिस्तानी चाहत्याशी भररस्त्यात भांडण झाले. घडलेल्या प्रकारानंतर आता पाकिस्तानचे आजी माजी खेळाडू हॅरिस रौफच्या बचावासाठी सोशल मिडियाच्या मैदानात उतरले आहेत.
हॅरिस रौफबरोबर काय घडले?
सध्या सोशल मीडियावर हॅरिसचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात एक पाकिस्तानी चाहता हॅरिस रौफला शिवीगाळ करतो अन् मग त्याचा राग अनावर होतो. त्यानंतर हॅरिस रौफ त्याच्या अंगावर धावून जातो असा तो व्हिडीओ आहे. हॅरिस रौफने आधी दावा केला होता की तो फॅन भारतीय आहे पण नंतर तो पाकिस्तानी फॅन असल्याचे त्याने सांगितले.
पाकिस्तानी आजी-माजी क्रिकेटपटूंकडून हॅरिस रौफचा बचाव... कोण काय म्हणाले?
- शाहिद आफ्रिदी
हॅरिस रौफ बरोबर घडलेला प्रकार अयोग्य आहे. आपण कोणाचाही अपमान करणे किंवा मर्यादा ओलांडणे ही गोष्ट बरोबर नाही. जे लोक द्वेष पसरवत आहेत त्यांनी आता हे सगळं थांबवायला हवं.
- हसन अली
हॅरिस रौफबद्दल व्हायरल झालेला व्हिडीओ मी पाहिला. मी सर्व क्रिकेट फॅन्सना विनंती करतो की कोणावरही टीका करताना काही मर्यादा पाळायला हव्यात. समोरच्याला दुखावणे हा त्याचा हेतु नसावा. टीका ही निरर्थक नसावी. खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबाचाही विचार करायला हवा. जिव्हाळा, शांतता टिकवून ठेवायलाच हवा.
- मोहम्मद रिझवान
हॅरिस रौफशी भांडण करणारा फॅन भारतीय असो वा पाकिस्तानी, मूळ मुद्दा असा आहे की ती व्यक्ती सुसंस्कृत नव्हती. एखाद्या व्यक्तीचा अशा प्रकारे अपमान करणे, त्यातही त्याच्या कुटुंबाच्या समोर त्याला वाईट बोलणे ही गोष्ट अयोग्य आहे. अशा गोष्टींचा विरोध केलाच पाहिजे.
- पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी म्हणाले-
हॅरिस रौफबाबत घडलेली घटना अतिशय भयावह आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. आमच्या खेळाडूच्या विरोधात अशाप्रकारचे वर्तन आम्ही खपवून घेणार नाही. त्या फॅन्सनी तत्काळ हॅरिस रौफची माफी मागायला हवी. असे न केल्यास त्या व्यक्तिविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.