अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
सुपर आठचे दोन्ही सामने गमविल्यामुळे सहयजमान अमेरिका टी-२० विश्वचषकातून जवळपास बाहेर पडला आहे. तरीही दोन प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न, अमेरिकेत टी-२० विश्वचषकाचे आयोजन यशस्वी ठरले? आणि दुसरा प्रश्न अमेरिकेत क्रिकेटचे भविष्य काय? अमेरिकेला इतक्या मोठ्या स्पर्धेचे सहयजमानपद सोपविण्याचा प्रयोग तसा यशस्वी ठरला. येथील स्पोर्ट्स मार्केटची भव्यता लक्षात घेत आयसीसीने विश्वचषकाच्या आयोजनानिमित्ताने क्रिकेटसाठी नव्या बाजाराचा शोध घेतला. अमेरिकेतील क्रीडाप्रेमींची ओळख चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणारी अशी आहे. यामुळेच नवे खेळ अमेरिकेत स्थिरावण्याचा प्रयत्न करीत असतात. कोणताही खेळ जिवंत राहण्यासाठी त्याचा उद्योग बनणे महत्त्वपूर्ण मानले जाते. एनबीए, एनएफएल, बेसबॉल लीग अमेरिकेत यशस्वी होऊ शकले, कारण यात व्यावसायिक दृष्टिकोन आहे.
सिलिकॉन व्हॅलीचे काय?
अमेरिकेत पाय ठेवण्यासाठी आयसीसीला तीन- चार दशके मेहनत घ्यावी लागली. आता सिलिकॉन व्हॅलीत क्रिकेट रुजविण्याचे आव्हान अमेरिकन क्रिकेट असोसिएशन आणि आयसीसीपुढे आहे. भारतीय उपखंडातील नागरिक आणि कॅरेबियन आधीपासून क्रिकेट चाहते आहेतच, पण स्थानिकांना खेळाकडे आकर्षित करावे लागेल. त्यांच्यात क्रिकेटची ओढ निर्माण करावी लागेल. अमेरिकेतील लोक जोवर हा खेळ स्वीकारणार नाहीत तोवर मार्केट शोधणे कठीण होईल. अमेरिकेत भारतीय लोक उच्च पदावर आहेत. सत्या नडेला (मायक्रोसॉफ्टचे सीईओ), गुगल, ॲप्पलसारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये भारतीय आयटी व्यावसायिक सेवा देत आहेत. त्यांच्यात क्रिकेटची आवडही आहे. हेच लोक सिलिकॉन व्हॅलीत क्रिकेट लोकप्रिय करण्यास मदत करू शकतील. मात्र, हे काम आव्हानात्मक असेल.
अमेरिका क्रिकेट स्वीकारेल?
अन्य खेळांच्या भाऊगर्दीत क्रिकेट अमेरिकेत स्वीकारले जाईल, हे आताच सांगणे कठीण आहे. तथापि, टी-२० विश्वचषकाच्या साखळी सामन्यात अमेरिका संघाची दमदार कामगिरी, पाकिस्तानसारख्या संघावर केलेली मात आणि सुपर आठमध्ये धडक दिल्यामुळे अमेरिकेत क्रिकेट स्वीकारले जाईल याची खात्री पटली. स्थानिक क्रिकेट चाहते हे भारतीय उपखंडातून आलेले आहेत. त्यातही भारतीय लोक अधिक. भारतीय जेथे जातात तेथे बॉलिवूड आणि क्रिकेट सोबत नेतात. कॅरेबियनदेखील आपल्यासोबत क्रिकेट आणि वेस्ट इंडीज द्वीप समूहातील संगीत सोबत नेतात. यामुळे अमेरिकेत भारतीय उपखंडातील आणि कॅरेबियन नागरिक क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देतील, असे म्हणू शकतो.
...असे चालणार नाही
अमेरिकेत क्रिकेट समृद्ध कसे होईल? हा प्रश्न महत्त्वाचा आहेच; पण त्याआधी एक गोष्ट विचारात घ्यावी लागेल ती म्हणजे टी-२० विश्वचषकानंतर अमेरिकेचा संघ पुढील आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळेल. तर त्याचे उत्तर आहे २०२६. कारण पुढील टी-२० विश्वचषक २०२६ साली भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली पार पडणार आहे. म्हणजेच या दोन वर्षांच्या दरम्यान अमेरिकेच्या संघाला एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी नाही. केवळ अमेरिकाच कशाला तर स्कॉटलंड, आयर्लंडसारख्या देशांनासुद्धा कमी सामने खेळायला मिळणे हा चिंतेच विषय आहे. या सर्व संघांनी मोठ्या संघांविरुद्ध आपले कसब पणाला लावले होते. काहींना त्यात यशही आले. पण, सामने जर वारंवार झाले, तर या देशांनासुद्धा स्वतःचा खेळ उंचावण्यास मदत होईल. नव्या देशांसाठी सामने आयोजित करणे हे आयसीसीसमोरचे एक मोठे आव्हान आहे. अमेरिका, स्कॉटलंड आणि आयर्लंड संघातील खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधीसुद्धा उपलब्ध व्हायला हवी. तेव्हाच त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी अमेरिका गरजेची
या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने अनेकांना एक गोष्ट कळली की, अमेरिकेत क्रिकेटच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे; पण त्यासाठी उपलब्ध संधीचे सोने करावे लागेल. तसेच क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशासाठी अमेरिकेत या खेळाचा विकास परिणामकारक ठरू शकतो. अपेक्षा आहे की टी-२० विश्वचषकाच्या समारोपानंतर आयसीसी यासंबंधात गंभीरपणे विचार करेल. सोबतच बीसीसीआय आणि इतर देशांच्या क्रिकेट संघटनासुद्धा आयसीसीचे समर्थन करू शकतात.
Web Title: T20 World Cup 2024 How successful was the Cricket World Cup in America, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.