T20 World Cup 2024: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला तरी त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया विश्वचषक खेळणार आहे. येत्या जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. यासाठी या महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ जाहीर होईल असे अपेक्षित आहे. अशातच संघाचा कर्णधार रोहित शर्माने विविध मुद्द्यांवर भाष्य करून काही अफवांना पूर्णविराम दिला. आगामी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रोहितने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात होते. पण, हिटमॅनने यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. (Rohit Sharma News)
मागील काही दिवसांपासून क्रिकेट वर्तुळात अशी चर्चा होती की, रोहित, आगरकर आणि द्रविड यांच्यात बैठक झाली. हार्दिक पांड्याच्या निवडीबद्दल या बैठकीत चर्चा झाली असल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सलामीवीर असतील असेही सांगितले गेले. मात्र, कर्णधार रोहित शर्माने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये माजी खेळाडूंशी संवाद साधताना याविषयी भाष्य केले.
रोहितने चर्चांना दिला पूर्णविराम
रोहित म्हणाला की, माझी कोणाशीही भेट झालेली नाही. चाहत्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मी आणि आगरकर याबद्दल अधिकृत माहिती देऊ तेव्हाच काही ते स्पष्ट होईल. मी जोपर्यंत बीसीसीआयचे अधिकारी, अजित आगरकर आणि राहुल द्रविड यांच्यासोबत कॅमेऱ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत सर्व काही अफवाच आहेत असे गृहीत धरले तरी चालेल. कोणत्या खेळाडूसोबत खेळपट्टीवर अथवा ड्रेसिंग रूममध्ये वेळ घालवायला आवडतो? या प्रश्नावर रोहितने सांगितले की, रिषभ पंत हा विनोदी आहे, तो नेहमी मला हसवतो. मला जेव्हा मनोरंजनाची गरज भासते तेव्हा मी त्याच्याशी संपर्क साधतो.
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या अखेरीस ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेला आयपीएलचा हंगाम खेळाडूंसाठी एक संधी असून महत्त्वाचा आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात चमकदार कामगिरी करून आपापल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे आव्हान खेळाडूंसमोर आहे.
Web Title: T20 World Cup 2024 I haven't met anyone indian captain Rohit sharma put an end to the discussion A big statement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.