T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi Update : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर रोहित शर्मा ( Rohit Sharma) अपयशी ठरल्याने साऱ्यांना धक्का बसला. अफगाणिस्तानविरुद्धच्या आजच्या सामन्यात रोहित अवघ्या ८ धावा करून माघारी परतला. डावखुरा जलदगती गोलंदाज फझलहक फारुकीने कटर चेंडूवर रोहितला चुकीचा फटका मारण्यास भाग पाडले. या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितने ३ वेळा डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाला विकेट दिली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त रोहित २४ वेळा डावखुऱ्या जलदगती गोलंदाजांसमोर बाद झाला आणि ही सर्वाधिक संख्या आहे. पॉल स्टर्लिंग २३ वेळा असा बाद झाला आहे.
भारतीय संघाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील Super 8 फेरीतील प्रवास आजपासून सुरू झाला आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत रोहितने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ही खेळपट्टी न्यूयॉर्कपेक्षा चांगली असल्याचे मत रोहितने व्यक्त केले. कुलदीपचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला आणि मोहम्मद सिराजला विश्रांती दिली गेली. कुलदीप यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना खेळत आहे. तिसऱ्या षटकात फझलहक फारुकीने कर्णधार रोहितला पायचीत पकडले होते. अम्पायर पॉल रेईफेलने नाबाद दिले. DRS मध्ये चेंडू आऊटसाईड पिच असल्याने निर्णय कायम राखला गेला. पण, त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहितचा ( ८) फटका हुकला आणि राशिद खानने सोपा झेल घेतला.
फारुकीने स्लोव्हर कटर टाकल्याने रोहित फसला. रोहितची विकेट घेताच फारुकीने WWE स्टार जॉन सेना ( John Cena) याच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितने आज ( ७७) ख्रिस गेलला ( ७६) मागे टाकून दुसरे स्थान पटकावले. डेव्हिड वॉर्नर ( ८९) टॉपर आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांचे आज निधन झाले आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून टीम इंडियाचे खेळाडू काळीफित बांधून मैदानावर उतरले. रिषभ पंतचा ११ धावांवर नवीन उल हकने सोपा झेल टाकला. मोहम्मद नबी निराश दिसला.
Web Title: T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi : Fazalhaq Farooqi did John Cena's "You Can't See Me" celebration after dismissing Rohit Sharma, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.