T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi Update : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत Super 8 गटातील पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला. सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या यांच्या उपयुक्त फटकेबाजीनंतर जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) मॅच विनिंग स्पेल टाकली. जसप्रीतने ४-१-७-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. या विजयासह भारतीय संघ ग्रुप १ मध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना खेळणाऱ्या कुलदीप यादवने दोन, तर अर्शदीप सिंगने तीन विकेट्स घेऊन विजयात हातभार लावला.
रोहित शर्मा ( ८), रिषभ पंत ( २०) , विराट कोहली ( २४) व शिवम दुबे ( १०) हे माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. या दोघांनी ३७ चेंडूंत ६० धावांची भागीदारी केली. सूर्या २८ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर झेलबाद झाला. हार्दिक ( ३२ धावा) झेलबाद झाल्यानंतर अक्षर पटेलने शेवटच्या षटकांत ( १२) चांगली फटकेबाजी करून संघाला ८ बाद १८१ धावांपर्यंत पोहोचवले. फझलहक फारुकीने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या आणि राशिद खानने ४-०-२६-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली.
रहमनुल्लाह गुरबाजने ( ११) अफगाणिस्तानला आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु जसप्रीत बुमराहने दुसऱ्या षटकात चतुराईने ही विकेट मिळवून दिली. इब्राहिम झाद्रान ( ८) व हझरतुल्लाह जझई ( २) यांना अनुक्रमे अक्षर पटेल व बुमराह यांनी माघारी पाठवून अफगाणिस्तानची अवस्था ३ बाद २३ धावा अशी केली. अक्षरने त्याचे पहिलेच षटक निर्धाव टाकून विकेट मिळवली.
कुलदीप यादवने त्याची निवड सार्थ ठरवताना गुलबदिन नईबला ( १७) झेलबाद केले. अफगाणिस्तानला ६७ धावांवर चौथा धक्का बसल्याने त्यांना ५८ चेंडूंत ११५ धावा करायच्या होत्या. पुढच्याच षटकात रवींद्र जडेजाच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अझमतुल्लाह ओमारजाई ( २६ ) झेलबाद झाला.
भारतीय गोलंदाजांनी सामना संपूर्णपणे आपल्या नियंत्रणात राखताना अफगाणिस्तानसमोर शेवटच्या ३६ चेंडूंत ९१ धावा विजयासाठी शिल्लक ठेवल्या होत्या. बुमराहला पुन्हा गोलंदाजीला आणण्याचा डाव यशस्वी ठरला आणि त्याने नजिबुल्लाह झाद्रानला ( १९) माघारी पाठवून मोठे यश मिळवून दिले. कुलदीपने ( २-३२) भारताच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर करताना मोहम्मद नबीला ( १४) बाद केले. राशिद खान ( २) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अर्शदीप सिंगला विकेट देऊन तंबूत परतला. तोच प्रयत्न नवीन उल हककडून ( ०) झाला आणि अर्शदीपला सलग दुसरी विकेट मिळाली. अर्शदीपची ( ३-३६) हॅटट्रिक थोडक्यात हुकली, परंतु त्याने शेवटच्या षटकांत विकेट मिळवली. अफगाणिस्तानला सर्वबाद १३४ धावा करता आल्या आणि भारताने ४७ धावांनी सामना जिंकला.
Web Title: T20 World Cup 2024 IND vs AFG Live Marathi : India beat Afghanistan in Super 8 group 1 match, Suryakumar yadav and Jasprit bumrah match winner
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.