IND vs AFG Match Updates : अफगाणिस्तानचा पराभव करून भारतीय संघाने सुपर-८ मध्ये विजयी सलामी दिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने निर्धारित २० षटकांत ८ बाद १८१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांना घाम फुटला. ते निर्धारित २० षटकांत सर्वबाद केवळ १३४ धावा करू शकले आणि ४७ धावांनी सामना गमावला. या सामन्यात अप्रतिम क्षेत्ररण करणाऱ्या रवींद्र जडेजाला 'Fielder of the Match award' देऊन सन्मानित करण्यात आले.
बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड जड्डूला मेडल देऊन सन्मानित करत आहेत. जड्डूला हे मेडल मिळताच त्याने एकच जल्लोष केला. राहुल द्रविड यांना उचलून घेत जडेजाने त्यांच्या मार्गदर्शनाला दाद दिली. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात जडेजाने त्याच्या ३ षटकांत २० धावा देत १ बळी घेतला. याशिवाय तीन अप्रतिम झेल घेण्यात जड्डूला यश आले.
प्रथम फलंदाजी करताना भारताला कर्णधार रोहित शर्माच्या (८) रूपात सुरुवातीलाच एक मोठा झटका बसला. त्यानंतर विराट कोहलीने (२४) साजेशी खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, अफगाणिस्तानकडून पुन्हा एकदा राशिद खानने कमाल केली. त्याने विराट कोहली, रिषभ पंत आणि शिवम दुबे यांना आपल्या जाळ्यात फसवले. याशिवाय फझलहक फारूकीने रोहित आणि जडेजाला तंबूत पाठवले. मात्र, सूर्यकुमारच्या खेळीने भारताला तारले. त्याने ३ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने २८ चेंडूत ५३ धावांची स्फोटक खेळी केली. १८१ धावांचा बचाव करताना भारताकडून जसप्रीत बुमराहने आणि अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३-३ बळी घेतले, तर कुलदीप यादव (२) आणि अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.