T20 World Cup 2024 IND vs AUS Live Marathi : विराट कोहलीला महत्त्वाच्या सामन्यात अपयश आले... पाचव्या चेंडूवर तो भोपळ्यावर माघारी परतल्याने ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात आनंदाचे वातावरण होते. पण, हिटमॅन रोहित शर्माने ( Rohit Sharma) मिचेल स्टार्कने टाकलेल्या तिसऱ्या षटकात ६,६,४,६,०,६ अशा २९ धावा कुटून टीम इंडियावरील दडपण टिचकीत कमी केले. मिचेल स्टार्कचे हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील सर्वात महागडे षटक ठरले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने रोहित शर्मा थोडासा नाराज दिसला, परंतु त्याने हे आव्हान स्वीकारून कागारूंसमोर तगडे आव्हान ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला. २०२३च्या वन डे वर्ल्ड कप फायनलनंतर उभय संघ समोरासमोर येत असल्याने उत्सुकता वाढली आहे. टीम इंडिया त्या पराभवाची परतफेड करेल अशी सर्वांना आशा आहे. भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रवींद्र जडेजा, अक्षर पटेल व कुलदीप यादव असे तीन फिरकीपटू आणि जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग व हार्दिक पांड्या असे ३ जलदगती गोलंदाजांचे पर्याय संघात आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, शिवम दुबे यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल.
मिचेल स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर फुलटॉसवर चौकार खेचण्यापासून रोहित शर्मा चुकला. दुसरा चेंडू स्टार्कने थोडा वाईड फेकला अन् रोहितच्या बॅटशी संपर्क होऊन स्लीपमध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या हाती विसावला व जोरदार अपील झाले. पण, चेंडू कॅच होण्यापूर्वी बम्प झाल्याचे रिप्लेत दिसले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२०त सर्वाधिक ७९४ धावा कुटणारा विराट कोहली आज भोपळाही फोडू शकला नाही. जोश हेझलवूडच्या चेंडूवर त्याने खणखणीत फटका मारला, परंतु ट्रॅव्हिस हेडने तितकाच अप्रतिम परतीचा झेल टिपला. पण, रोहितने जलवा दाखवून पुढच्याच षटकात स्टार्कला ६,६,४,६,०,१w,६ अशा २९ धावा चोपल्या.