T20 World Cup 2024 IND vs AUS Live Marathi : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 8 च्या अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्माच्या वादळी ९२ धावांनी भारताला दोनशेपार धावा उभारून दिल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी वाढवताना दिसला. मिचेल मार्शने त्याला चांगली साथ दिली होती, परंतु अक्षर पटेलने घेतलेल्या अविश्वसनीय झेलने मॅच फिरली. भारताने या विजयासह WTC Final आणि वन डे वर्ल्ड कप फायनलच्या पराभवाचा वचपा काढला. भारतीय संघ २००७, २०१४, २०१६, २०२२ व २०२४ असे पाचवेळा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे.
रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) फटकेबाजीने ऑस्ट्रेलियाला रडकुंडीला आणले. त्याने ४१ चेंडूंत ९२ धावांची स्फोटक खेळी करताना ७ चौकार व ८ खणखणीत षटकार खेचले. विराट कोहली शून्यावर बाद झाल्याचे दडपण न घेता रोहितने पुढच्याच षटकात मिचेल स्टार्कला २९ धावा कुटल्या. रोहित व रिषभ पंत ( १५) यांनी ३८ चेंडूंतील ८७ धावांची भागीदारी केली. स्टार्कनेच रोहितची नंतर विकेट घेतली. रोहित व सूर्यकुमार यादव ( ३१) यांनी २० चेंडूंत ३४ धावा केल्या. शिवम दुबे ( २८) व सूर्या यांनी १९ चेंडूंत ३२ धावांची भागीदारी केली. हार्दिकने १७ चेंडूंत २७ धावा चोपल्या आणि भारताला ५ बाद २०५ धावा केल्या. भारताला शेवटच्या ५ षटकांत ४३ धावा केल्या.
अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला ( ६ ) माघारी पाठवले. जसप्रीत बुमराहच्या बाऊन्सरवर मिचेल मार्शचा झेल उडाला होता, परंतु रिषभ पंतने त्यासाठी प्रयत्नच केला नाही. यावरून रोहित शर्मा संतापलेला दिसला आणि त्याला डाईव्ह का मारली नाही, हा जाब विचारला. मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पॉवर प्लेमध्ये १ बाद ६५ धावांपर्यंत ऑस्ट्रेलियाला पोहोचवले. कुलदीप यादवने टाकलेल्या ९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्शने बॅकफूटवर जाऊन पूल शॉट मारला, परंतु
अक्षर पटेलने सीमारेषेवर अविश्वसनीय झेल टिपला. मार्श ३७ धावांवर माघारी परतल्याने त्याची व हेडची ४८ चेंडूंत ८१ धावांची भागीदारी तुटली.
भारताविरुद्ध नेहमीच दमदार खेळ करणाऱ्या हेडने २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या १० षटकांत २ बाद ९९ धावा झाल्या होत्या आणि त्यांना आणखी १०७ धावा विजयासाठी हव्या होत्या. रवींद्र जडेजाने टाकलेल्या ११व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलने रिव्हर्स स्वीप खेचून १७ धावा चोपल्या. १३व्या षटकात अक्षर पटेलने ३ धावा दिल्याने मॅक्सवेलवर दडपण आले आणि कुलदीपच्या चेंडूवर पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात त्याचा ( २०) त्रिफळा उडाला. अक्षरने पुढच्या षटकात मार्कस स्टॉयनिसला ( २) हार्दिक पांड्याकरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाला ३० चेंडूंत ६५ धावा हव्या होत्या आणि रोहितने जसप्रीत बुमराहची दोन षटकं राखून ठेवली होती.
बुमराहने १७व्या षटकात हेडला माघारी पाठवले. हेडने ४३ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ७६ धावा केल्या. या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी टीकू दिले नाही. टीम डेव्हिडची ( १५) विकेट घेऊन अर्शदीपने ( ३-३७) मॅच भारताच्या पारड्यात टाकली. ऑस्ट्रेलियाला ७ बाद १८१ धावा करता आल्या. भारताने २४ धावांनी सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे.
अफगाणिस्तानचा फायदा...
भारतीय संघाने आपले उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले आणि २७ जूनला त्यांचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. तेच ऑस्ट्रेलियाला आता बांगलादेशने उद्या अफगाणिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची प्रार्थना करावी लागेल. हा सामना अफगाणिस्तानने जिंकल्यास ४ गुणांसह ते उपांत्य फेरीत जातील, पण बांगलादेशने बाजी मारल्यास तीन संघांचे प्रत्येकी २ गुण होतील. अशा वेळी नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल...
Web Title: T20 World Cup 2024 IND vs AUS Live Marathi : TEAM INDIA HAVE QUALIFIED FOR SEMIFINAL, will face england in 27th june; Axar Patel took a miracle Catch, Australia faith depend on Afghanistan vs Bangladesh Match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.