T20 World Cup 2024 IND vs AUS Live Marathi : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 8 च्या अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्माच्या वादळी ९२ धावांनी भारताला दोनशेपार धावा उभारून दिल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी वाढवताना दिसला. मिचेल मार्शने त्याला चांगली साथ दिली होती, परंतु अक्षर पटेलने घेतलेल्या अविश्वसनीय झेलने मॅच फिरली. भारताने या विजयासह WTC Final आणि वन डे वर्ल्ड कप फायनलच्या पराभवाचा वचपा काढला. भारतीय संघ २००७, २०१४, २०१६, २०२२ व २०२४ असे पाचवेळा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे.
रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) फटकेबाजीने ऑस्ट्रेलियाला रडकुंडीला आणले. त्याने ४१ चेंडूंत ९२ धावांची स्फोटक खेळी करताना ७ चौकार व ८ खणखणीत षटकार खेचले. विराट कोहली शून्यावर बाद झाल्याचे दडपण न घेता रोहितने पुढच्याच षटकात मिचेल स्टार्कला २९ धावा कुटल्या. रोहित व रिषभ पंत ( १५) यांनी ३८ चेंडूंतील ८७ धावांची भागीदारी केली. स्टार्कनेच रोहितची नंतर विकेट घेतली. रोहित व सूर्यकुमार यादव ( ३१) यांनी २० चेंडूंत ३४ धावा केल्या. शिवम दुबे ( २८) व सूर्या यांनी १९ चेंडूंत ३२ धावांची भागीदारी केली. हार्दिकने १७ चेंडूंत २७ धावा चोपल्या आणि भारताला ५ बाद २०५ धावा केल्या. भारताला शेवटच्या ५ षटकांत ४३ धावा केल्या.
अफगाणिस्तानचा फायदा... भारतीय संघाने आपले उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले आणि २७ जूनला त्यांचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. तेच ऑस्ट्रेलियाला आता बांगलादेशने उद्या अफगाणिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची प्रार्थना करावी लागेल. हा सामना अफगाणिस्तानने जिंकल्यास ४ गुणांसह ते उपांत्य फेरीत जातील, पण बांगलादेशने बाजी मारल्यास तीन संघांचे प्रत्येकी २ गुण होतील. अशा वेळी नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल...