T20 World Cup 2024 IND vs BAN Live Marathi : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. Super 8 मध्ये सलग दोन विजय मिळवून टीम इंडिया ४ गुणांसह ग्रुप १ मध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे. भारताचा सुपर ८मधील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ जूनला होणार आहे. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला पराभूत केले आहे आणि उद्या अफगाणिस्तानविरुद्धची लढत जिंकून त्यांना उपांत्य फेरीचे तिकिट निश्चित करता येणार आहे. बांगलादेशने दोन पराभवांमुळे स्पर्धेबाहेर जाण्याचा मार्ग निश्चित केला आहे. जर अफगाणिस्तानने उद्या धक्कादायक निकाल लावला, तर भारताला उपांत्य फेरीतील स्थान पक्कं करण्यासाठी वाट पाहावी लागेल.
रोहित शर्मा ( २३) व विराट कोहली ( ३७) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यापासून वंचित राहिले. रिषभ पंतने ( ३६) फॉर्म कायम राखला, परंतु चुकीच्या फटक्याने पुन्हा त्याचा घात केला. सूर्यकुमार यादव ( ६) अपयशी ठरला असला तरी शिवम दुबेला ( ३४) गवसलेला सूर दिलासा देणारा ठरला. हार्दिक पांड्या व शिवम दुबे यांनी ३४ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली. हार्दिकने २७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५० धावा केल्या आणि भारताला ५ बाद १९६ धावांपर्यंत पोहोचवले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ११ वेळा १८० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम भारताने नावावर केला आणि इंग्लंडला ( १०) मागे टाकले.