T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : 'बापू' अर्थात अक्षर पटेल ( Axar Patel) याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडला गुडघे टेकायला लावले. रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांच्यासह फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने १७१ धावा उभ्या केल्या. फिरकीला साथ देणाऱ्या संथ खेळपट्टीवर पटेलने ( ३-२३) इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले. त्यानंतर कुलदीप यादवने ( ३-१९) कमाल करताना भारताचा विजय पक्का केला. टीम इंडिया जेतेपदाच्या लढतीत २९ जूनला दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे.
विराट कोहली ( ९) व रिषभ पंत ( ४) यांना अपयश आले. पावसाच्या लपंडावात रोहित शर्मा ( ५७) व सूर्यकुमार यादव ( ४७) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना धुऊन काढले. रोहित ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. सूर्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले, परंतु रोहितसह त्याने जोडलेल्या ७३ धावा इंग्लंडची डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरल्या. हार्दिक पांड्याने २३ धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. रवींद्र जडेजाच्या नाबाद १७ धावा व अक्षर पटेलच्या १० धावांन भारताला ७ बाद १७१ धावांपर्यंत पोहोचवले. खेळपट्टी पाहता या मॅच विनिंग धावा आहेत. इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनने ३ विकेट्स घेतल्या.
जॉस बटलर व फिल सॉल्ट यांनी ३ षटकांत २६ धावा करताना भारतावर दडपण निर्माण केले होते. पण, चौथ्या षटकात अक्षर पटेलला गोलंदाजीला आणले गेले आणि त्याला रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बटलर ( २३) रिषभ पंतला झेल देऊन परतला. जसप्रीत बुमराहने अप्रतिम चेंडूवर सॉल्टचा ( ५) त्रिफळा उडवून इंग्लंडला मोठा धक्का दिला. अक्षरने त्याच्या पुढच्या षटकात जॉनी बेअरस्टोचा ( ०) त्रिफळा उडवला. पॉवर प्लेमध्ये इंग्लंडच्या ३ बाद ३९ धावा झाल्या होत्या. ८व्या षटकात अक्षरने वाईड चेंडू टाकला अन् मोईन अली स्टेप आऊट झाला. रिषभने चतुराईने चेंडू कलेक्ट केला अन् स्टम्पिंग करून इंग्लंडला चौथा धक्का दिला.
कुलदीपने वळवलेल्या चेंडूवर सॅम कुरन ( २) पायचीत झाला आणि इंग्लंडला ४९ धावांवर पाचवा धक्का बसला. इंग्लंडला ६० चेंडूंत ११० धावा हव्या असताना कुलदीपच्या चेंडूवर रिषभने हॅरी ब्रुकला झेल टाकला. पण, एका चेंडूनंतर कुलदीपने ब्रूकचा ( २५) त्रिफळा उडवून इंग्लंडच्या उरलेल्या आशाही मावळून टाकल्या. कुलदीपने पुढच्या षटकात ख्रिस जॉर्डनला ( १) पायचीत करून इंग्लंडला सातवा धक्का दिला. लिएम लिव्हिंगस्टन ( ११) रन आऊट होऊन माघारी परतला. आदिल राशिदही ( २) रन आऊट झाला. जसप्रीतने शेवटची विकेट घेऊन इंग्लंडचा डाव १०३ धावांवर गुंडाळला आणि २०२२च्या उपांत्य फेरीत इंग्लंडने केलेल्या पराभवाचा भारताने वचपा काढला.