T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : गयाना येथे होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पावसाचा धोका आहे. गयानामध्ये सकाळपासून दडी मारून बसलेला पाऊस आता धो धो कोसळतोय आणि त्यामुळे हा सामना लांबणीवर पडण्याची शक्यता बळावली आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १२.१० वाजेपर्यंत मॅच सुरू न झाल्यास षटकं कमी होण्यास सुरुवात होईल. तरीही विलंब झाल्यास १०-१० षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न असेल. पण, गयाना येथे पावसाचा अंदाज असताना राखीव दिवस का नाही, हा सवाल सर्वांना पडला आहे.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास सुपर ८ गटात अव्वल स्थानी राहिल्याने भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल. इंग्लंडचा प्रवास उपांत्य फेरीतच संपेल. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यासारखा कोणताही राखीव दिवस IND vs ENG सामन्याला नाही. मात्र, निकालासाठी २५० मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीसाठी ही वेळ केवळ १९० मिनिटे होती.
ते म्हणाले, ''संघांना सलग दिवस 'प्ले-ट्रॅव्हल-प्ले' करावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी राखीव दिवस ठेवला गेलेला नाही. पण, दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण सामना सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. त्यामुळे भारतीय वेळेनुसार जरी चाहत्यांना मध्यरात्री जागरण करावे लागत असले तरी तेथे हा सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त २५० मिनिटे ठेवली गेली आहेत.
तसेच, भारताच्या सामन्यात राखीव दिवस असल्यास, सामना २८ जून रोजी खेळला गेला असता आणि दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याला ताबडतोब बार्बाडोसला रवाना व्हावे लागले असते, जिथे अंतिम सामना खेळला जाणार आहे. अशा स्थितीत संघाला सरावासाठी वेळ मिळला नसता.