T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : पावसाच्या लपंडावात रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना धुऊन काढले. रोहित ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. सूर्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले, परंतु रोहितसह त्याने जोडलेल्या ७३ धावा इंग्लंडची डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरल्या.
गयानामध्ये पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला आणि ८.५० ला झालेला टॉस इंग्लंडने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जॉस बटलरचा हा निर्णय ऐकून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आनंदित झाला, कारण भारतालाही प्रथम फलंदाजी करायची होती. भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. दुसऱ्याच चेंडूवर एड्ज लागून रोहितला चौकार मिळाला. विराट कोहलीने तिसऱ्या षटकात खणखणीत षटकार खेचून चाहत्यांना आनंदित केले. फक्त टायमिंगवर त्याने चेंडू सीमापार पाठवला. आक्रमक झालेल्या विराटला ( ९) चौथ्या चेंडूवर रिस टॉप्लीने त्रिफळाचीत करून माघारी पाठवले. निराश झालेल्या विराटचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांत्वन केले. रोहित उत्तुंग फटके खेचत होता, परंतु बॅट व चेंडूचा हवा तसा संपर्क होताना दिसला नाही. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात सॅम कुरनच्या गोलंदाजीवर रिषभ पंत ( ४) मिड विकेटवर झेलबाद झाला. आदिल राशिदच्या चेंडूंवर रोहितने रिव्हर्स स्वीप व स्वीप मारून चौकार खेचले. सूर्यकुमार यादवने त्याचा फ्लिक शॉट खेळून थर्ड मॅनवर षटकार खेचला अन् हा फटका पाहून विराट थक्क झालेला दिसला. ८व्या षटकानंतर पावसाने पुन्हा व्यत्यय आणला. भारताचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० धावा करणारा रोहित पाचवा खेळाडू ठरला.
११.१० वाजता सामना पुन्हा सुरू झाला. लिएम लिव्हिंगस्टन व आदिल राशिद यांनी भारतीय फलंदाजांना सावध खेळण्यास भाग पाडले, परंतु सॅम कुरनच्या षटकात रोहित व सूर्याने खणखणीत सिक्स खेचले. रोहितने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या षटकात १९ धावा चोपल्या गेल्या. पण, राशिदच्या गुगलीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहितचा त्रिफळा उडवला. रोहित ३९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ५७ धावांवर बाद झाला आणि सूर्यासोबत ५० चेंडूंत ७३ धावांची भागीदारी तुटली. पुढच्याच चेंडूवर हार्दिक पांड्याचा स्लीपमध्ये झेल उडालेला, परंतु मोईन अलीच्या हाती चेंडू विसावण्यापूर्वी टप्पा खाल्ला. जोफ्रा आर्चरने भारताचा सेट फलंदाज सूर्याला ( ४७) माघारी पाठवले.
शिवम दुबेच्या जागी रवींद्र जडेजाला फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठवले. हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकांत चांगले फटके खेचले. हार्दिक १३ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारासह २३ धावांवर झेलबाद झाला. ख्रिस जॉर्डनने पुढच्याच चेंडूवर शिवम दुबेला बाद केले, परंतु तो यंदाच्या वर्ल्ड कपमधील दुसरी हॅटट्रिक पूर्ण नाही करू शकला. अक्षर पटेल ( १०) व जडेजाने ( १७ ) भारताला सन्मानजनक ७ बाद १७१ धावसंख्या उभारून दिली