T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : भारत-इंग्लंड यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना गयाना येथे होणार आहे. पावसाच्या लपंडावात हा सामना होणार, हे आधीच स्पष्ट झाले होते. गयाना येथे सकाळपासून पाऊस नव्हता, परंतु संध्याकाळी अचानक जोरदार पाऊस आल्याने सर्वांची चिंता वाढवली होती. या सामन्यासाठी राखीव दिवस नसल्याने ICC ने २५० अतिरिक्त मिनिटं राखून ठेवली आहेत. त्यामुळे निकालासाठी किमान १०-१० षटकांचा सामना अपेक्षित आहे. भारतीय संघ निर्विवाद वर्चस्व गाजवून उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे, तर इंग्लंडला इतरांच्या कृपेवर सुपर ८ गाठता आले आणि तिथे त्यांनी महत्त्वाच्या सामन्यात दमदार कामगिरी करून दाखवली.
राखीव दिवसाबाबत आयसीसीचे मत...संघांना सलग दिवस 'प्ले-ट्रॅव्हल-प्ले' करावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी राखीव दिवस ठेवला गेलेला नाही. पण, दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण सामना सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. त्यामुळे भारतीय वेळेनुसार जरी चाहत्यांना मध्यरात्री जागरण करावे लागत असले तरी तेथे हा सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त २५० मिनिटे ठेवली गेली आहेत. तरीही पावसामुळे सामना झालाच नाही तर सुपर ८मध्ये अव्वल स्थानावर असल्याने टीम इंडिया फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.
पाऊस सुरूच राहिल्यास आणि सामना सुरू होण्यास उशीर झाल्यास, ४० षटकांच्या खेळासाठी सामना १२.१० पर्यंत सुरू होणे गरजेचे आहे. पण, १२.१० नंतर षटकं कमी होण्यास सुरुवात होईल. ICCने या सामन्यासाठी २५० मिनिटांचा अतिरिक्त वेळ राखून ठेवला आहे. जेणेकरून किमान १०-१० षटकांचा सामना खेळवता येईल, परंतु त्यासाठीही वेळ ठरवली आहे. १० षटकांच्या सामन्यासाठी मध्यरात्री १.४४ वाजता तो सुरू होणे गरजेचा आहे. प्रतीक्षा कालावधी १.४४ च्या पुढे वाढल्यास, सामना पूर्णपणे रद्द केला जाईल. या स्थितीत भारत अंतिम फेरीत पोहोचेल.