Rohit Sharma News Record : भारतीय संघाने आयर्लंडला पराभूत करून ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये विजयी सलामी दिली. २०१३ पासून भारताला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यामुळे यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया ट्रॉफीचा दुष्काळ संपवणार का हे पाहण्याजोगे असेल. कर्णधार रोहित शर्मानेआयर्लंडविरूद्धच्या विजयानंतर एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. तो ट्वेंटी-२० मध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. (Rohit Sharma News)
भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकले आहेत. आयर्लंडविरूद्ध विजय मिळवताच रोहितने याबाबतीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. रोहितच्या नेतृत्वात ४२ सामने जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला एकही ICC ट्रॉफी जिंकता आली नसली तरी, महेंद्रसिंग धोनीला मागे टाकण्याची त्याने किमया साधली. धोनीच्या नेतृत्वात भारताने ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला आहे. रोहितने आतापर्यंत ५५ ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये संघाने ४२ सामने जिंकले आहेत, तर टीम इंडियाने १२ सामने गमावले आहेत.
टीम इंडियाचा ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत अ गटात समावेश करण्यात आला असून त्यात कॅनडा, अमेरिका, पाकिस्तान आणि आयर्लंडचाही समावेश आहे. यावेळी २० संघ विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाले असून, त्यांची प्रत्येकी पाच गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. भारताचा पुढील सामना रविवारी न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानशी होणार आहे.
सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणारे भारतीय कर्णधार
- रोहित शर्मा - ४२ सामने
- महेंद्रसिंग धोनी - ४१ सामने
- विराट कोहली - ३० सामने
- हार्दिक पांड्या - १० सामने
- सूर्यकुमार यादव - ५ सामने
भारत आणि आयर्लंड यांनी एकमेकांविरुद्ध नऊ सामने खेळले असून त्यापैकी आठ लढती जिंकून भारताने आघाडी घेतली आहे आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. यापूर्वी भारत आणि आयर्लंड यांच्यातील शेवटचा सामना २०२३ मध्ये झाला होता, ज्यामध्ये भारताने आयर्लंडचा ३३ धावांनी पराभव केला होता.