Jasprit Bumrah Sanjana Ganesan, T20 World Cup 2024 IND vs PAK: भारतीय संघाने रविवारी रात्री टी२० विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानवर चित्तथरारक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना रिषभ पंतच्या ४२ धावांच्या जोरावर भारताने कशीबशी ११९ धावांपर्यंत मजल मारली आणि पाकिस्तानला १२० धावांचे माफक आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाने अप्रतिम सुरुवात केली होती. १४व्या षटकापर्यंत पाकिस्तानची धावसंख्या ३ बाद ८० होती. पण त्यानंतर जसप्रीत बुमराहने केलेल्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाजांनी गुडघे टेकले. ४ षटकांत केवळ १४ धावा देऊन ३ बळी मिळवणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीराचा किताब देण्यात आला. विशेष बाब म्हणजे, सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याची मुलाखत घेण्यासाठी ICCकडून समोर अँकर म्हणून त्याची पत्नीच उभी राहिली. तो क्षण साऱ्यांनाच भावला.
पहिल्या ४ षटकांत भारताला पाकिस्तानची एकही विकेट घेता आली नाही. अखेर पाचव्या षटकात जसप्रीत बुमराहने बाबर आझमला माघारी धाडले. त्यानंतरही मोहम्मद रिझवानने एक बाजू लावून धरली होती. पण १५ व्या षटकात बुमराहने रिझवानचा त्रिफळा उडवला. तर १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने इफ्तिखार अहमदला तंबूत पाठवले. त्याच्या या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. या यशाचे कौतुक करण्यासाठी त्याची पत्नी संजना गणेसन मैदानात होतीच. पण महत्त्वाचे म्हणजे ती तेथे बुमराहची पत्नी म्हणून नव्हे तर ICC ची अँकर म्हणून उपस्थित होती.
संजनाने अतिशय औपचारिक पद्धतीने आपला पती जसप्रीत बुमराहची मुलाखत घेतली. मुलाखतीत बुमराह म्हणाला, "आयर्लंड सामन्यापेक्षा हे पिच वेगळे होते. सामन्यात क्षणाक्षणाला गोष्टी बदलत जात होत्या. रिझवान सामन्यात तळ ठोकून होता. त्यामुळे मी एवढाच विचार करत होतो की त्याला धावा करून द्यायच्या नाहीत. पण त्यात एक चांगली गोष्ट घडली की त्याची विकेट मला मिळाली. त्या विकेटमुळे सामन्याला कलाटणी मिळाली याचा मला आनंद आहे. आम्ही आमच्या प्लॅनिंग प्रमाणेच खेळलो."
मुलाखतीच्या शेवटी धमाल-मस्ती
मुलाखत अत्यंत औपचारिक पद्धतीने झाल्यानंतर शेवटी संजनाने जसप्रीतचे अभिनंदन केले. त्यानंतर बुमराह तिला म्हणाला की, आता मी ३० मिनिटांनी भेटूया. त्यावर संजनाने हसत-हसत प्रश्न विचारला की- जेवणाचे काय? त्या जसप्रीत बुमराह काहीही न बोलता हसून निघून गेला.