IND vs PAK Match : ट्वेंटी-२० विश्वचषकात भारताने सातव्यांदा पाकिस्तानला पराभूत करण्याची किमया साधली. रविवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने शेजाऱ्यांचा पराभव करून आपला विजयरथ सुरू ठेवला. सहा धावांनी पराभव होताच पाकिस्तानी संघावर शेजारील देशातील चाहत्यांसह माजी खेळाडू तुटून पडले. खासकरून सलामीवीर मोहम्मद रिझवान चाहत्यांच्या निशाण्यावर आला. त्याने ४४ चेंडूत ३१ धावांची संथ खेळी केली. त्याच्या या संथ खेळीमुळेच पाकिस्तानचा पराभव झाला असल्याचा तर्क अनेकांनी लावला. मात्र, आता प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांनी रिझवानचा बचाव केल्याचे दिसते.
पाकिस्तानचे प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांच्या म्हणण्यानुसार, १५ षटकांनंतर फलंदाज रणनीतीनुसार कामगिरी करू शकले नाहीत. याशिवाय फलंदाज अतिरिक्त दबावात आल्याचे दिसले. मला वाटते की, अशा पद्धतीच्या खेळपट्टीवर स्ट्राईक रोटेट करणे महत्त्वाचे ठरते. पाकिस्तानी संघाने पहिल्या १५ षटकांपर्यंत चांगली कामगिरी केली. पण यानंतर डाव फसला आणि आम्ही लवकर विकेट गमावल्या.
पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव
गॅरी कस्टर्न यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला चांगली खेळी केली. पण, त्यानंतर आम्ही पुनरागमन केले आणि प्रत्युत्तर दिले. १० ते २० या षटकांमध्ये आमची चांगली कामगिरी राहिली. आमच्याकडे चांगल्या वेगवान गोलंदाजांची फळी आहे. खूप पर्याय असूनही कमजोर फलंदाजीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. आम्ही अशाच पद्धतीने गोलंदाजी केली तर आमच्याविरूद्ध फलंदाजी करणे कोणत्याही संघाला कठीण जाईल.
सलग दुसरा विजय अन् पराभव
पाकिस्तानचा पराभव करताच भारताने या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. तर पाकिस्तानला या पराभवासह सलग दुसऱ्यांदा हार पत्करावी लागली. त्यांना सलामीच्या सामन्यात यजमान अमेरिकेने पराभवाची धूळ चारली होती. भारतीय संघाने आयर्लंडला नमवून विजयी सलामी दिली. त्यामुळे पाकिस्तानला सुपर ८ मध्ये पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. किंबहुना शेजाऱ्यांना इतरही संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
Web Title: T20 World Cup 2024 IND vs PAK Match Head Coach Garry Custern reacts after Pakistan's loss
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.