T20 World Cup 2024 : भारतीय संघाने बुधवारी यजमान अमेरिकेचा पराभव करून विजयाची हॅटट्रिक लगावली. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये सुपर-८ मध्ये प्रवेश करणारा भारत तिसरा संघ ठरला. या आधी ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेने ही फेरी गाठली. टीम इंडियाने यजमान अमेरिकेला पराभवाची धूळ चारली अन् सुपर-८ चे तिकीट मिळवले. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि शिवम दुबेच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने विजय साकारला.
सध्या सोशल मीडियावर भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही अतिउत्साही चाहते विराटसमोर नारेबाजी करताना दिसत आहेत. अनेकांनी विराटची पत्नी अनुष्का शर्माच्या नावाच्या घोषणा दिल्या. विराट सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. "दिवाली हो या होली, अनुष्का लव कोहली", अशा घोषणांचा पाऊस चाहत्यांनी पाडला.
दरम्यान, विराट कोहली ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये धावांसाठी संघर्ष करत आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही. अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात कोहलीला खाते देखील उघडता आले नाही. यापूर्वी विराट विश्वचषकात एकदाही डक आऊट झाला नव्हता. मूळचा भारतीय असलेल्या सौरभ नेत्रावलकरने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
बुधवारी न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील यंदाच्या विश्वचषकातील अखेरचा सामना खेळवला गेला. माफक लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करून भारताने अमेरिकेविरूद्ध विजय साकारला. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि शिवम दुबेची संयमी खेळी भारताला विजय देऊन गेली. भारतीय संघाने साखळी फेरीतील आपल्या तिसऱ्या सामन्यात अमेरिकेचा पराभव करून विजयाची हॅटट्रिक लगावली. टीम इंडियाने गोलंदाजीत कमाल करून अमेरिकेला ११० धावांत रोखले. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यानंतर सूर्या आणि दुबेने मोर्चा सांभाळला.