India vs Pakistan Match : ट्वेंटी-२० विश्वचषकात रविवारी ९ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी अर्थात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने असणार आहेत. यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संधी मिळाली आहे. फिक्सिंग प्रकरणामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. पण, राजीनामा परत करत आमिर तब्बल ६ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी आयसीसीशी बोलताना आमिरने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे तोंडभरून कौतुक केले.
तसेच मोहम्मद आमिरने भारतीय कर्णधार रोहितला बाद करण्याची रणनीती सांगितली. न्यूयॉर्क येथील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत होणार आहे. पाकिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेविरूद्ध पराभव पत्करावा लागला. सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानकडून षटक टाकत असलेल्या आमिरने या षटकात १८ धावा दिल्या होत्या.
मोहम्मद आमिर म्हणाला की, सर्वांनाच माहीत आहे की रोहित एक वर्ल्ड क्लास खेळाडू आहे. तो फलंदाजीला आल्यावर कोणत्याच गोलंदाजाला सोडत नाही. पण, सुरुवातीलाच त्याच्या पॅडवर चेंडू टाकून त्याला अडचणीत आणता येऊ शकते. मात्र, रोहितने १५-२० चेंडू खेळल्यानंतर तो गोलंदाजांसाठी आणखी घातक होतो. त्यामुळे माझा प्रयत्न असा आहे की, रोहित फलंदाजीला येताच सुरुवातीपासूनच त्याच्या पॅडवर गोलंदाजी करून त्याला लवकर कसे बाद करता येईल.
आमिरने सांगितली रणनीती"रोहितची प्रत्येक खेळी चांगलीच असते, कारण सुरुवातीला खेळपट्टी फारशी फलंदाजांना साथ देत नाही. कारण चेंडू नवीन असतो त्यामुळे गोलंदाजांना फायदा मिळतो. लोकेश राहुल सुरुवातीच्या षटकांमध्ये संघर्ष करताना दिसला आहे. पण मला वाटते की रोहितची खेळी सामन्याची दिशा बदलते. रोहित त्याच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे फलंदाजी करू शकला नाही आणि आमचे आघाडीचे फलंदाज बाबर आझम आणि फखर झमान यांनी चांगली कामगिरी केली तर नक्कीच सामना आमच्या बाजूने फिरेल", असेही मोहम्मद आमिरने सांगितले.
पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
पाकिस्तानचे पुढील सामने - ९ जून - पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क११ जून - पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क१६ जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड, लॉदरहील