India vs Pakistan Live : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये आज रविवारी भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. क्रिकेटच्या मैदानात जेव्हा भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने असतात तेव्हा अवघ्या जगाचे लक्ष या सामन्याकडे लागते. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे हा बहुचर्चित सामना खेळवला जात आहे. अनेक माजी खेळाडू हा सामना पाहण्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. काहीजण समालोचक म्हणून विश्वचषकाशी जोडले आहेत. भारताचे माजी खेळाडू नवज्योतसिंग सिद्धू हे देखील अमेरिकेत आहेत.
पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सिद्धू आणि आफ्रिदी एकमेकांची आपुलकीने विचारपूस करताना दिसत आहेत. सिद्धूंनी गळाभेट घेताच म्हटले की, हँडसम आफ्रिदी... याच्यासारखा आता कोण आहे का? हा मनाने देखील खूप चांगला आहे. तुमच्याकडचे (पाकिस्तान) असे खेळाडू आता कुठे गेलेत? तर आफ्रिदी म्हणाला की, आम्ही सिद्धू पाजीसोबत खूप क्रिकेट खेळलो आहोत.
दरम्यान, भारतीय संघाने आयर्लंडला नमवून विजयी सलामी दिली आहे, तर पाकिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताविरूद्धचा सामना पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद
पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.