India vs Pakistan : ट्वेंटी-२० विश्वचषकात पाकिस्तानला आपल्या सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. मग कॅनडाविरूद्धचा सामना जिंकून शेजाऱ्यांनी स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. भारताने पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवून विजय मिळवला. याचाच दाखला देत माजी खेळाडू पाकिस्तानी संघावर टीका करत आहेत. अखेरच्या काही चेंडूचा सामना करत असलेल्या नसीम शाहला देखील पाकिस्तानी चाहते ट्रोल करत आहेत. अशातच शेजारील देशातील नामांकित अभिनेत्री कुब्रा खान नसीमच्या समर्थनार्थ मैदानात उतरली.
भारताविरूद्ध माफक १२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला अपयश आले. न्यूयॉर्क येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानची फजिती झाली. प्रथम गोलंदाजी करताना शेजाऱ्यांनी शानदार कामगिरी केली. नसीम शाहने निर्धारित ४ षटकांत ३ बळी घेऊन २१ धावा दिल्या. याशिवाय कठीण खेळपट्टीवर फलंदाजी करताना त्याने १० धावांचे योगदान दिले. मात्र, तो पाकिस्तानी संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारताने तोंडचा घास पळवताच नसीम शाहला अश्रू अनावर झाले. भरमैदानात त्याला रडू कोसळले.
नसीमच्या समर्थनार्थ अभिनेत्री मैदानातअलीकडेच पाकिस्तानातील वृत्तवाहिनी जिओ न्यूजशी बोलताना अभिनेत्री कुब्रा खान म्हणाली की, मी नसीम शाहला पाहून क्रिकेट पाहायला सुरुवात केली. त्याच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे मला क्रिकेटची आवड लागली. तो एक चांगला खेळाडू आहे. त्याने ट्वेंटी-२० विश्वचषकात भारताविरूद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी केली. तो कौतुकास पात्र आहे पण दुर्दैवाने काहीजण त्याला लक्ष्य करत आहेत. आमच्या संघाने चांगला खेळ करून देखील त्यांना टीकाकारांचा सामना करावा लागत आहे हे दुर्दैव आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान हे संघ अ गटात आहेत. भारताने तीन विजयांसह सुपर-८ चे तिकीट मिळवले आहे. अ गटातून भारतीय संघाने सुपर-८ मध्ये स्थान मिळवले आहे. तर अमेरिका तीन सामन्यांपैकी दोन विजयासह ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्हीही संघांचा अखेरचा सामना आयर्लंडविरूद्ध होणार आहे. पाकिस्तानला सुपर-८ मध्ये जागा मिळवण्यासाठी शेवटचा सामना चांगल्या फरकाने जिंकावा लागेल. याशिवाय अमेरिकेचा मोठ्या फरकाने पराभव होईल अशी प्रार्थना करावी लागेल.