T20 World Cup 2024 : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर आहे. ग्रुप १ मध्ये भारताने आतापर्यंत दोन सामने जिंकून ४ गुण व २.४२५ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे. २४ जूनला होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीनंतर उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट होईल. भारतीय संघाचा नेट रन रेट हा जबरदस्त आहे आणि त्यांना उपांत्य फेरीच्या शर्यतीतून माघारी पाठवण्यासाठी ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान यांना एकूण १२३ हून अधिक धावांनी आपापल्या साखळी फेरीत विजय मिळवावा लागेल. उदा. जर ऑस्ट्रेलियाने भारतावर ३१ धावांनी विजय मिळवला, तर अफगाणिस्तानला बांगलादेसवर ९३ धावांनी विजय मिळवावा लागणार आहे.
टीम इंडियाचे उपांत्य फेरीतील स्थान मोठा उलटफेर न झाल्यास निश्चित आहे. पण, भारतीय संघाला ग्रुप १ मधील अव्वल स्थान कायम राखावे लागेल आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहे. ICC आणि क्रिकेट वेस्ट इंडिज ( CWI) यांनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस नसल्याचे स्पष्ट केले आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारतीय संघाच्या हिताच्या दृष्टीने रात्री ८ वाजता आयोजित केला गेला आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीचा सामना २७ जूनला गयाना येथे खेळेल. या सामन्यात पावसाची शक्यता ८९ टक्के आहे आणि राखीव दिवसही नाही.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस नाही, परंतु अतिरिक्त २५० मिनिटे म्हणजेच ४ तास १० मिनिटांचा कालावधी दिला गेला आहे. त्यामुळे हा सामना त्याच दिवशी संपवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सामन्यासाठी अतिरिक्त चार तास देण्यात आले आहेत जेणेकरून संघाला सलग दिवस खेळावे लागणार नाही, प्रवास करावा लागणार नाही आणि नंतर खेळावे लागणार नाही. पहिली सेमी फायनल २६ जूनला त्रिनिदाद येथे तेथील स्थानिक वेळेनुसार रात्री ८.३० वाजल्यापासून ( भारतीय वेळ पहाटे ६ वा.) सुरू होईल. या सामन्याला राखीव दिवस आहे आणि त्यामुळे पावसाचा व्यत्यय आल्यास २७ जूनला मॅच खेळवली जाईल.
दुसरा उपांत्य फेरीचा सामना गयाना येथे होईल आणि स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता ( भारतीय वेळ ८.३०) सुरू होईल. पावसाचा व्यत्यय आल्यानंतरही अतिरिक्त २५० मिनिटांत त्याच दिवशी संपवला जाईल. त्यामुळे अम्पायर्सना हा सामना पूर्ण करण्यासाठी ८ तास वाट पाहावी लागेल. तरीही सामना होऊ न शकल्यास ग्रुप १ मधील अव्वल स्थान भारताने कायम ठेवल्यास ते थेट फायनलसाठी पात्र ठरतील. २८ जून हा प्रवासाचा दिवस आहे आणि २९ जूनला फायनल होणार आहे.
Web Title: T20 World Cup 2024 : India's semifinal in Guyana likely to be WASHED OUT with 89% rain, India will straight move into the Finals for finishing first in Group-1
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.