India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान या आशियाई देशांमध्ये क्रिकेट म्हणजे जणू काही धर्मच... या धर्माचे कोट्यवधी भक्त आहेत. दोन्हीही देशाचे राष्ट्रीय संघ क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा भिडतात तेव्हा अवघ्या जगाचे लक्ष या सामन्याकडे लागते. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ ला सुरुवात झाली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेत ९ जून रोजी भिडणार आहेत. एका सामन्याचा अपवाद वगळता पाकिस्तानला भारताविरूद्ध विश्वचषकात विजय मिळवता आला नाही. भारताचा पाकिस्तानविरूद्ध नेहमीच वरचष्मा राहिला आहे. खरे तर टीम इंडियाचा दबदबा यंदा देखील कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. या आधी शेजाऱ्यांनी आयर्लंडविरूद्ध आणि न्यूझीलंडच्या नवख्या संघाविरूद्ध विश्वचषकाची तयारी केली. सुरू असलेल्या ट्वेंटी-२० मालिकेमुळेच पाकिस्तान आणि इंग्लंड यांचा सराव सामना नाही. दुसरीकडे भारतीय संघातील खेळाडू आयपीएल खेळून अमेरिकेला गेले आहेत. विशेष बाब म्हणजे रिंकू सिंग वगळता विश्वचषकाच्या संघातील एकही शिलेदार आयपीएल फायनलचा भाग नसल्याने त्यांना पुरेशी विश्रांती मिळाली. आयपीएलपूर्वी टीम इंडियाने घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरूद्ध मालिका खेळली होती. याच मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे मोठ्या कालावधीनंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पुनरागमन झाले.
९ तारखेला थरार
मागील ट्वेंटी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या अप्रतिम खेळीने पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवला. भारताने अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात बाजी मारून शेजाऱ्यांचा धुव्वा उडवला होता. येत्या ९ तारखेला न्यूयॉर्कच्या धरतीवर टीम इंडिया पाकिस्तानला वरचढ ठरेल अशी चिन्हं आहेत. पाकिस्तानच्या तुलनेत भारताकडे असलेली फिरकीपटूंची चांगली फळी ही टीम इंडियाची जमेची बाजू म्हणता येईल. पाकिस्तानच्या संघाला खासकरून त्यांच्या वेगवान गोलंदाजांसाठी ओळखले जाते. हारिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि मोहम्मद आमिर हे चार गोलंदाज विश्वचषकाच्या संघात दिसू शकतात. तर फिरकीपटू म्हणून शादाब खान आणि इफ्तिखार अहमद हे पर्याय आहेत.
पण, मागील काही कालावधीपासून पाकिस्तानी गोलंदाज संघर्ष करत आहेत. शाहीन आफ्रिदी बळी घेण्यात यशस्वी होत असला तरी त्याचा इम्पॅक्ट फारसा दिसला नाही. हारिस रौफची होत असलेली धुलाई... त्यात त्याच्या दुखापतीने त्याला क्रिकेटपासून फार काळ दूर नेले. नसीम शाह दुखापतीतून सावरला असला तरी त्याला अद्याप म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. केवळ एकाच मालिकेनंतर आफ्रिदीची कर्णधारपदावरून झालेली हकालपट्टी आणि बाबरला पुन्हा एकदा मिळालेले कर्णधारपद. एकूणच पाकिस्तानी संघाचे संतुलन बिघडल्याचे दिसते. याचाच फटका मागील काही दिवसांपासून संघाला बसत आहे. न्यूझीलंडचे वरिष्ठ खेळाडू आयपीएलमध्ये व्यग्र असताना त्यांच्या नवख्या संघाने पाकिस्तानला त्यांच्या घरात जाऊन कडवी झुंज दिली. शेजाऱ्यांना मायदेशात मालिका जिंकण्यात अपयश आले. दुसरीकडे आयर्लंडने देखील पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात बाबर आझमच्या संघाचा पराभव करून क्रिकेट विश्वाला धक्का दिला.
दरम्यान, पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय संघ आताच्या घडीला मजबूत स्थितीत आहे. यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली. यशस्वीने मुंबईविरूद्ध शतकी खेळी केली, तर विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. सूर्यकुमार यादव देखील चांगल्या लयनुसार खेळत आहे. हार्दिक पांड्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. तसेच जसप्रीत बुमराह वगळता भारताचे वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये संघर्ष करताना दिसले. मात्र, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे फिरकीपटू निर्णायक ठरू शकतात. न्यूयॉर्कसारख्या नवीन खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.
पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -
बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाबखान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
Web Title: T20 World Cup 2024 match between India and Pakistan will be played on 9th
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.