T20 World Cup 2024 : अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जात आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर यंदाच्या विश्वचषकातील अखेरचा सामना बुधवारी खेळवला गेला. भारतीय संघाने यजमान अमिरिकेला पराभूत करून सुपर-८ चे तिकीट मिळवले. भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना संपताच न्यूयॉर्कमधील हे स्टेडियम पाडण्यात येणार आहे. यासाठी बुलडोझर पोहोचले आहे. कारण हे स्टेडियम केवळ ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी बांधण्यात आले होते. हे क्रिकेटचे पहिले मॉड्यूलर स्टेडियम आहे. या मैदानाच्या बांधकामावर तब्बल ३० मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे २४८ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
न्यूयॉर्कचे नासाऊ काउंटी स्टेडियम पाच महिन्यांत बांधण्यात आले होते. अमेरिकेत क्रिकेटला लोकप्रिय करण्यासाठी आयसीसीने ट्वेंटी-२० विश्वचषकाचे सामने न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय टेक्सास आणि फ्लोरिडा या ठिकाणांची देखील स्पर्धेतील सामन्यांसाठी निवड करण्यात आली. नासाऊ काउंटी स्टेडियम बनवण्याचा निर्णय सप्टेंबर २०२३ मध्ये घेण्यात आला अन् अवघ्या काही दिवसांत स्टेडियम उभारण्यात आले.
...म्हणूत तुटणार स्टेडियम
खरे तर याआधी नॉर्थ कॅरोलिनातील मॉरिसविलेबद्दलही चर्चा झाली होती. पण पर्यावरणाचे कमी नुकसान व्हावे यासाठी नासाऊ काउंटीची निवड करण्यात आली. न्यूयॉर्क शहरापासून ते खूप लांब आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी स्टेडियम बांधण्यासाठी आयसीसीने ही जागा भाडेतत्त्वावर घेतली होती.
दरम्यान, ट्वेंटी-२० विश्वचषकातील पुढील सामने वेस्ट इंडिज आणि फ्लोरिडा येथे खेळवले जातील. आता एकही सामना न्यूयॉर्क येथे होणार नाही. बुधवारी भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना संपताच हे स्टेडियम पाडण्यासाठी बुलडोझर आले. अवघ्या काही सामन्यांसाठी स्टेडियम बांधले गेले, ज्यासाठी तब्बल तब्बल २४८ कोटी रूपयांचा खर्च आला.