Join us  

कर्णधाराने कॅच सोडली, नेपाळने मॅच गमावली! नेदरलँड्सचा रोमहर्षक विजय, मॅक्स ओ'डोडचा तडाखा

 नेपाळ क्रिकेट संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दहा वर्षानंतर पुनरागमन करताना पहिलाच सामना गाजवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 12:54 AM

Open in App

T20 World Cup 2024, NEP vs NED :  नेपाळ क्रिकेट संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दहा वर्षानंतर पुनरागमन करताना पहिलाच सामना गाजवला. नेदरलँड्सविरुद्धच्या लढतीत १०६ धावा करूनही त्यांच्या गोलंदाजांनी सामना रंगतदार अवस्थेत ठेवला होता. पण, मॅक्स ओ'डोडचा १८व्या षटकात कर्णधार रोहित पौडेलने सोडलेला झेल महागात पडला. मॅक्सने नाबाद ५४ धावा करून नेदरलँड्सला ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. पण, नेपाळच्या खेळाने चाहत्यांची मनं जिंकली. 

काठमांडू ते डल्लास! Nepal च्या चाहत्यांचं प्रेम पाहून सारे चकित, अमेरिकेत नाद खुळी गर्दी तर...

सलामीवीर कुशल भुर्तेल ( ७), आसीफ शेख ( ४), अनील शाह ( ११), कुशल मल्ला ( ९) व दिपेंद्र सिंग ऐरी ( १) यांना अपयश आल्याने नेपाळची अवस्था ५ बाद ५३ अशी झाली. कर्णधार रोहित पौडेल चांगला खेळ करताना दिसला, परंतु समोरून त्याला साथ मिळाली नाही. सोमपाल कामी भोपळ्यावर माघारी परतला. टीम प्रिंगलेने नेपाळचा मोठा धक्का देताना ३७ चेंडूंत ५ चौकारांसह ३५ धावा करणाऱ्या रोहितला माघारी पाठवले. करण केसी ( १७) व गुलशन झा ( १४) या दोघांनी संघाला शंभरी पार नेले. नेपाळला २० षटकांत सर्वबाद १०६ धावा करता आल्या. प्रिंगले व बीक यांनी प्रत्येकी ३, तर पॉल व्हॅन मिकेरन व बॅस डी लीड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

२०१४ व २०२४ असे दोन वर्ल्ड कप खेळलेला एकमेव खेळाडू सोमपाल कामीने नेपाळला दुसऱ्या षटकात यश मिळवून दिले. नेदरलँड्सचा मिचेल लेव्हीट ( १) झेलबाद झाला. विक्रमजीत सिंग व मॅक्स ओ'डोड यांची ४३ धावांची भागीदारी दिपेंद्र सिंग ऐरीने तोडली. विक्रमजीत २३ धावांवर पायचीत झाला. मॅक्स ओ'डोड व सिब्रँड इंगेलब्रेच यांनी २८ धावा जोडून डाव सावरला होता, परंतु सोमपालने चतुराईने इंग्लब्रेचला ( १४) रन आऊट केले. मॅक्स ओ'डोडने मारलेला सरळ चेंडू अडवताना सोमपालच्या हाताला स्पर्श झाला आणि नॉन स्ट्रायकर एंडला इंग्लब्रेच रन आऊट झाला.  नेपाळच्या गोलंदाजांनी सामना रंजक वळणावर आणला होता आणि नेदरलँड्सच्या फलंदाजांवर त्यांनी सातत्याने दडपण निर्माण केले होते. 

३० चेंडूंत २८ धावांची गरज असताना कर्णधार स्कॉट एडवर्डला ( ५) अबिनाश बोहाराने त्रिफळाचीत करून माघारी पाठवले. नेपाळने २०१४च्या वर्ल्ड कपमध्ये हाँगकाँग व अफगाणिस्तान यांना पराभूत केले होते आणि आजच्या सामन्यातील त्यांची कामगिरी पाहता ते विजयाच्या दिशेने कूच करत होते. २४ चेंडूंत २३ धावा नेदरलँड्सला हव्या होत्या. १८व्या षटकात कर्णधार रोहितने नेदरलँड्सचा सेट फलंदाज ओ'डोड ( ४०) चा सोपा झेल टाकला. १२ चेंडूंत १३ धावा हव्या असताना ओ'डोडने सलग २ चेंडूंवर ४-६ खेचले आणि अर्धशतकही पूर्ण केले. त्याने ४८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह नाबाद ५४ धावा करून संघाचा विजय पक्का केला. नेदरलँड्सने १८.४ षठकांत ४ बाद १०९ धावा केल्या. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024नेपाळ