T20 World Cup 2024, NEP vs NED : नेपाळच्या चाहत्यांच्या क्रिकेट प्रेमाने पुन्हा एकदा जगाला दखल घेण्यास भाग पाडले. २०१४ नंतर प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणाऱ्या नेपाळ क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी मोठा जनसमुदाया अमेरिकेतील डल्लास येथे जमलेला दिसला. या सामन्याचे थेट प्रक्षेपण काठमांडू येथे मोठ्या पडद्यावर दाखवण्याचं आयोजन सरकारकडून केले गेले होते आणि तेथेही हजारोंच्या संख्येने चाहते उपस्थित होते. पण, नेपाळच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांसमोर मान टाकली.. कर्णधार रोहित पौडेल ( Rohit Paudel ) एकटा नेदरलँड्ससमोर शड्डू ठोकून उभा राहिला. त्याने दोन मोठ्या विक्रमांची नोंद केली.
नेदरलँड्सने लढतीत नेपाळविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नेपाळला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते डल्लास येथे उपस्थित होते. नेपाळमध्ये मोठ्या पडद्यावर या सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखवले जात होते आणि तेथेही प्रचंड गर्दी जमलेली पाहायला मिळाली. पण, नेपाळच्या फलंदाजांना साजेशी सुरुवात करता आली नाही. सलामीवीर कुशल भुर्तेल ( ७) व आसीफ शेख ( ४) फलकावर १५ धावा असताना माघारी परतले. टीम प्रिंगले व लॉगन व्हॅन बीक यांनी हे धक्के दिले. अनील शाह ( ११), कुशल मल्ला ( ९) व दिपेंद्र सिंग ऐरी ( १) यांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने नेपाळची अवस्था ५ बाद ५३ अशी झाली.
नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल याने आज मोठ्या विक्रमाची नोंद केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात तो सर्वात युवा कर्णधार ठरला. रोहित २१ वर्ष व २७६ दिवसांचा आहे आणि त्याने झिम्बाब्वेच्या प्रोस्पर उत्सेया ( २२ वर्ष व १७० दिवस) याचा विक्रम मोडला. शिवाय कमी वयात ५०+ आंतरराष्ट्रीय वन डे व ट्वेंटी-२० सामने खेळण्याचा राशीद खानचा ( २२ वर्ष) विक्रमही रोहितने आज मोडला. रोहित चांगला खेळ करताना दिसला, परंतु समोरून त्याला साथ मिळाली नाही. सोमपाल कामी भोपळ्यावर माघारी परतला. सोमपाल हा नेपाळकडून दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारा एकमेव खेळाडू आहे.
टीम प्रिंगलेने नेपाळचा मोठा धक्का देताना ३७ चेंडूंत ५ चौकारांसह ३५ धावा करणाऱ्या रोहितला माघारी पाठवले. करण केसी ( १७) व गुलशन झा ( १४) या दोघांनी संघाला शंभरी पार नेले. नेपाळला २० षटकांत सर्वबाद १०६ धावा करता आल्या. प्रिंगले व बीक यांनी प्रत्येकी ३, तर पॉल व्हॅन मिकेरन व बॅस डी लीड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
Web Title: T20 World Cup 2024, NEP vs NED : Rohit Paudel becomes the YOUNGEST men's World Cup captain ever, Nepal bowled out for 106 against Netherlands
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.