Join us  

टी-२० विश्वचषक : नव्या चेहऱ्यांना संधी नाही; भारताकडून सातत्याने चमकणाऱ्यांची होणार निवड

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कोणत्याही युवा खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता नसल्याची माहिती मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 7:23 AM

Open in App

नवी दिल्ली : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी युवा खेळाडू सध्या आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. मात्र, आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कोणत्याही युवा खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता नसल्याची माहिती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यांचा अस्थायी संघ १ मेपर्यंत जाहीर करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती खेळाडूंच्या तंदुरुस्तीनुसार पर्याय निवडतील. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, ‘टी-२० विश्वचषकासाठी कोणतेही प्रयोग किंवा मैदानावरील प्रदर्शनाद्वारे निवड होणार नाही. भारताकडून जे खेळाडू सातत्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतात, त्यांना संघात निवडले जाईल.’ त्यामुळे, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यापैकी एकाला संघातील स्थान गमवावे लागणार, हे स्पष्ट आहे. त्याचवेळी, संघात दोघांची निवड झाली तर मात्र शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांच्यापैकी एकाला संघाबाहेर जावे लागेल.

यांचे स्थान निश्चित...हार्दिक पांड्याची गोलंदाजी चिंतेचा विषय असला तरी त्याचे संघातील स्थान कायम मानले जात असून, विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, पंत, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांची निवड निश्चित मानली जात आहे. 

राखीव स्थानासाठीही वाढली चुरस- संघातील राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठीही चढाओढ आहे. यामध्ये अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई यांच्यामध्ये कडवी चुरस आहे. - अक्षर अष्टपैलू म्हणून उपयुक्त आहे. चहलने आपल्या ९ वर्षांच्या कारकीर्दीत एकदाही टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळलेली नाही. बिश्नोई दोघांच्या तुलनेत युवा असला, तरी तो गोलंदाजी कौशल्याच्या जोरावर बाजी मारू शकतो.

यष्टीरक्षकासाठी संघात स्थान मिळवण्याची मोठी स्पर्धा रंगली आहे. यासाठी ऋषभ पंत, संजू सॅमसन, लोकेश राहुल, जितेश शर्मा आणि इशान किशन यांच्यात मोठी चुरस रंगली आहे. राहुल आणि किशन सलामीला फलंदाजी करतात आणि यंदा आयपीएलमध्ये दोघांनाही फारशी चमक दाखवता आली नाही. रस्ते अपघात गंभीर जखमी झाल्यानंतर वर्षभराने क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेला पंत संघात स्थान मिळवण्यासाठी आघाडीवर आहे. 

संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीतील २० संभावित खेळाडू रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, ऋषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, आवेश खान. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माबीसीसीआय