T20 World Cup 2024, OMN vs SCOT Live : स्कॉटलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ओमानवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह स्कॉटलंड ब गटात ५ गुण व २.१६४ अशा नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहेत. त्यांचा हा विजय गतविजेत्या इंग्लंडसाठी धोक्याची घंटा घेऊन आला आहे आणि आता त्यांच्यावर स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आठवल्यांचा 'प्रतिक' ओमानचं क्रिकेट गाजवतोय... नाशिकच्या पोराकडून स्कॉटलंडची धुलाई
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ब गटात आज ओमान विरुद्ध स्कॉटलंड असा सामना सुरू झाला. प्रथम फलंदाजी करताना ओमानने दमदार फकटेबाजी केली. सलामीवीर प्रतिक आठवले ( Pratik Athavale ) याने मैदान गाजवले. त्याने ४० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा करताना स्कॉटलंडसमोर ७ बाद १५० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. प्रतिक हा मुळचा नाशिकचा, परंतु त्याने ओमानमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि तेथून क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. अयान खानने ३९ चेंडूंत नाबाद ४१ धावांचे योगदान दिले. स्कॉटलंडकडून साफियान शरीफने २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात ओमानचे गोलंदाज कमी पडले. स्कॉटलंडचा सलामीवीर जॉर्ज मुन्सीने चांगली फटकेबाजी केली. मिचेल जॉन्स १६ धावांवर माघारी परतल्यानंतर मुन्सी व ब्रँडन मॅकमुलेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची मॅच विनिंग भागीदारी केली. मुन्सी २० चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावांवर माघारी परतला. कर्णधार रिची बेरिंगटन ( १३ ) व मॅथ्यू क्रॉस ( नाबाद १५) यांनीही विजयात योगदान दिले. ब्रँडन ३१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर नाबाद राहिला आणि स्कॉटलंडने १३.१ षटकांत ३ बाद १५३ धावा करून सामना जिंकला.
गतविजेत्या इंग्लंडचे आव्हान संपुष्टात?ब गटात स्कॉटलंडने ३ सामन्यांत २ विजय मिळवून ५ गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. इंग्लंडविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता आणि दोन्ही संघांना १-१ गुण मिळाले होते. त्यानंतर इंग्लंडचा संघ काल ऑस्ट्रेलियाकडून हरला. त्यामुळे २ सामन्यांत त्यांचे फक्त १ गुण झाले आहेत. याच गटात ऑस्ट्रेलियात २ सामन्यांत ४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
स्कॉटलंडचा शेवटचा साखळी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे आणि त्यांनी हा सामना जिंकला तर त्यांचे सुपर ८ मधील स्थान पक्के होईल. पण, या सामन्यात हार झाली तरी त्यांना नेट रन रेट ( सध्या २.१६४) कसा चांगला ठेवता येईल हे पाहायला हवे. इंग्लंडचा नेट रन रेट हा -१.८०० असा आहे आणि उर्वरित दोन सामन्यांत त्यांना ओमान व नामिबिया यांचा मुकाबला करावा लागेल. हे सामने त्यांना मोठ्या फरकाने जिंकावे लागतील तेव्हा ते ५ गुणांसह स्कॉटलंडची बरोबरी करूनही नेट रन रेटच्या जोरावर सुपर ८ मध्ये पोहोचतील. अन्यथा त्यांचे आव्हान इथेच संपेल. ऑस्ट्रेलियाला दोनपैकी १ विजय पुरेसा आहे.