Join us  

पाकिस्तान अखेर जिंकला, पण संथ खेळीमुळे खड्डात राहिला; १४ षटकांत जिंकायचं होतं, पण... 

पाकिस्तान संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अखेर पहिल्या विजयाची चव चाखली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 11:10 PM

Open in App

T20 World Cup 2024 PAK vs CAN Live : पाकिस्तान संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अखेर पहिल्या विजयाची चव चाखली. दुबळ्या कॅनडाविरुद्ध त्यांना विजय मिळवण्यात यश आले, परंतु हा विजय त्यांच्यासाठी फार मदतगार ठरणारा नाही. सलग दोन पराभवांमुळे पाकिस्तानचा नेट रन रेट उणेमध्ये गेला होता, त्यामुळे त्यांना उर्वरित दोन सामन्यांत दणदणीत विजय मिळवणे गरजेचे होते. आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, १०७ धावांचे लक्ष्य त्यांनी १४ षटकांत पार केले असते तर त्यांना नेट रन रेट प्रचंड सुधारला असता. पण, मोहम्मद रिझवान व बाबर आजम यांच्या संथ खेळीने घात केला. 

दक्षिण आफ्रिकेचे Super 8 मधील स्थान पक्के; जाणून घ्या पाकिस्तानसह अन्य गटांमध्ये कोणाला बसणार धक्के

पाकिस्तानी गोलंदाजांनी कॅनडाविरुद्ध उत्तम गोलंदाजी केली. मोहम्मद आमीर ( २-१३) व हॅरीस रौफ ( २-२६ ) यांनी प्रत्येकी २, तर शाहीन आफ्रिदी व नसीम शाह यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. कॅनडाचा  सलामीवीर आरोन जॉन्सन खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने ४४ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावा चोपल्या. कॅनडाने २० षटकांत ७ बाद १०७  धावा करून सन्मानजनक लक्ष्य उभे केले. कलीम सना ( १३) व कर्णधार साद बीन जाफर ( १०) यांच्यासह कॅनडाच्या अन्य फलंदाजांना एकेही आकड्यावर माघारी जावं लागलं.

पाकिस्तानने आज सलामीची जोडी बदलली आणि तरीही त्यांना अपयश आले. सईम अयुब ( ६) याला पाचव्या षटकात डिलॉन हेलिगरने माघारी पाठवले. नेट रन रेट (-०.१५० ) सुधारण्यासाठी पाकिस्तानला हा सामना १४ षटकांच्या आत जिंकणे गरजेचा होता, परंतु कॅनडाच्या गोलंदाजांनी त्यांना जखडून ठेवले होते. मोहम्मद रिझवान व बाबर आजम ही अनुभवी जोडी मैदानावर होती, परंतु त्यांना अपेक्षित धावगती राखता आली नाही. पाकिस्तानने १० षटकांत १ बाद ५९ धावा केल्या. रिझवान व कर्णधार बाबर आजम यांना अर्धशतकी भागीदारी पूर्ण करण्यासाठी ५२ चेंडू खेळावे लागले. 

समालोचक कक्षात बसलेले वसीम अक्रम व रमीज राजा सातत्याने नेट रन रेटवरच बोलत होते. कॅनडाची गोलंदाजी व फिल्डींग भारी राहिली. १५व्या षटकात ६१ चेंडूंवरील ६३ धावांची भागीदारी तोडण्यात कॅनडाचा गोलंदाज हेलिगरला यश आले. बाबर ३३ चेंडूंत ३३ धावांत माघारी परतला. रिझवानने ५२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पाकिस्तानने १७. ३ षटकांत ३ बाद १०७ धावा करून विजय पक्का केला. रिझवान ५३ धावांवर नाबाद राहिला. 

 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024पाकिस्तान