T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये पाकिस्तान आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. शेजाऱ्यांनी साखळी फेरीतील पहिले दोन सामने गमावले. यजमान अमेरिका आणि भारतीय संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानचा साखळी फेरीतील तिसरा सामना आज मंगळवारी कॅनडाशी होत आहे. सुपर ८ च्या शर्यतीत कायम राहण्यासाठी पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत आजचा सामना जिंकावा लागेल. जर पराभूत झाल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
न्यूयॉर्कमध्ये पावसाचे वातावरण आहे. अनेक सामन्यांमध्ये पावसाच्या कारणास्तव व्यत्यय आला. कॅनडा आणि पाकिस्तान यांच्यातील सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. याच मैदानात भारत आणि पाकिस्तान भिडले होते. कॅनडा आणि पाकिस्तान यांच्यातील ही लढत न्यूयॉर्कच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होईल, तर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून सामन्याचा थरार रंगेल.
पाकिस्तानसमोर कॅनडाचे तगडे आव्हान दरम्यान, आताच्या घडीला पाकिस्तानच्या खात्यात भोपळा आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि कॅनडा यांच्या सामन्यात पाऊस झाला अन् सामना रद्द करावा लागला तर दोन्हीही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. १ गुण मिळताच पाकिस्तान सुपर ८ च्या शर्यतीतून बाहेर होईल. कारण असे झाल्यास ते जास्तीत जास्त ३ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. एकूणच आजच्या सामन्यात पाऊस झाल्यास पाकिस्तान ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधून बाहेर होईल.
पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा, आयर्लंड आणि भारत हे संघ अ गटात आहेत. पाकिस्तानला एकही सामना जिंकता न आल्याने ते गुणतालिकेत तळाशी आहेत. त्यांचा नेट रनरेट -०.१५० असा आहे. त्यामुळे त्यांना अखेरच्या दोन सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. तरच ते सुपर ८ च्या शर्यतीत टिकून राहतील. खरे तर दोन्ही सामने जिंकल्यानंतर देखील बाबर आझमच्या संघाला इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल.