T20 World Cup 2024 PAK vs IRE Live : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पाकिस्तान संघाने शेवटच्या साखळी सामन्यात दमदार कामगिरी केली. आयर्लंडचा निम्मा संघ त्यांनी २८ धावांतच माघारी पाठवून सामन्यावर पकड घेतली होती. पण, गॅरेथ डेलनीच्या फटकेबाजीने आयर्लंडला चांगल्या धावा उभारून दिल्या. या सामन्यात सर्व काही चांगलं असताना क्षेत्ररक्षणात गचाळपणा मात्र त्यांच्याकडून कायम राहिलेला दिसला. उस्मान खान आणि शाहीन आफ्रिदी यांच्या एक झेल घेण्यासाठी जोरदार टक्कर झालेली पाहायला मिळाली.
अमेरिका आणि भारताविरुद्धचे सामने हातचे गमावल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतील शेवट विजयाने करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला आहे. आयर्लंडविरुद्ध बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि नसीम शाहच्या जागी अब्बास आफ्रिदीला संधी मिळाली. पाकिस्तानी गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्याच षटकात अँडी बारवर्नी ( ०) आणि लोर्कन टकर ( २) यांची विकेट मिळवून दिली.
त्यानंतर मोहम्मद आमीरने दुसऱ्या षटकात कर्णधार पॉल स्टर्लिंगला ( १) मागे टाकले. शाहीनचा भेदक मारा पुढच्या षटकातही पाहायला मिळाला आणि त्याने हॅरी टेक्टरला भोपळ्यावर पायचीत केले. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात मोहम्मद आमीरने त्याची दुसरी विकेट मिळवली आणि जॉर्ज डॉक्रेल ( ११) याला बाद करून आयर्लंडची अवस्था ५ बाद २८ अशी केली. हॅरिस रौफने त्याच्या पहिल्या षटकात कर्टीस कॅम्फरला ( ७) बाद करून पाकिस्तानला ३२ धावांवर सहावे यश मिळवून दिले.
या यशानंतर पाकिस्तानी खेळाडूंचे ढिसाळ क्षेत्ररक्षण पुन्हा पाहायला मिळाले. गॅरेथ डेलनीचा सोपा झेल टाकला गेला. पण, इमाद वासीमने ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. डेलनी १९ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३१ धावांवर झेलबाद झाला. वासीमने पुढच्या षटकात मार्क एडरची ( १५) विकेट मिळवून दिली, पण आयर्लंडच्या फलंदाजाचा झेल घेताना उस्मान खान व शाहीन आफ्रिदी यांच्यात टक्कर झाली. नशीबाने शाहीनने चेंडूवरील पकड सोडली नाही. इमादने त्या षटकात आणखी एक विकेट मिळवताना आयर्लंडचा नववा फलंदाज माघारी पाठवला. जोश लिटलच्या २२ धावांनी आयर्लंडला ९ बाद १०६ धावांपर्यंत पोहोचवले.
Web Title: T20 World Cup 2024 PAK vs IRE Live : A huge collision between Shaheen Afridi and Usman Khan, Pakistan have restricted Ireland to 106/9 from their 20 overs, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.