T20 World Cup 2024 PAK vs IRE Live : पाकिस्तान संघ, पाकिस्तानसारखाच बेभरवशी खेळला, म्हणजे चाहत्यांना आधी आशा दाखवल्या आणि त्यावर नंतर पाणी फिरवले होते. आयर्लंडविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण, माफक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा फेस निघाला. आयर्लंडच्या गोलंदाजांनी ६ बाद ६२ अशी दयनीय अवस्था त्यांची केली. कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) मैदानावर उभा राहिला आणि संघाला ३ विकेट राखून सामना जिंकून दिला.
पाकिस्तानच्या गोलंदाजांना उशीराने सूर गवसला आणि आयर्लंडला त्यांनी ९ बाद १०६ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्याच षटकात दोन धक्के दिले. त्याने त्याच्या स्पेलमध्ये २२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. इमाद वासीमने ४-०-८-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. मोहम्मद आमीरनेही ११ धावांत २ बळी घेतले, तर हॅरीस रौफने १ विकेट मिळवली. आयर्लंडलच्या गॅरेथ डेनलीने १९ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३१ धावा केल्या, तर जोश लिटलच्या २२ धावांनी आयर्लंडला ९ बाद १०६ धावांपर्यंत पोहोचवले.
हे लक्ष्य पाकिस्तान सहज पार करेल असे वाटले होते, परंतु फलंदाजांनी गुडघे टेकले. त्यांचा निम्मा संघ ९.३ षटकांत ५७ धावांवर तंबूत पाठवण्यात आयर्लंडच्या गोलंदाजांना यश आले. मोहम्मद रिझवान ( १७), सईम आयुब ( १७), फखर जमान ( ५), उस्मान खान ( २) व शादाब खान ( ०) हे तंबूत परतले. बॅरी मॅककार्थीने यापैकी ३ विकेट्स घेतल्या. इमाद वासीमला ( ४) बाद करून कर्टीस कॅम्फरने त्याची दुसरी विकेट घेतली आहे. कर्णधार बाबर आजम याचाच पाकिस्तानला आधार होता. ३० चेंडूंत पाकिस्तानला २६ धावा करायच्या होत्या.
बाबर आणि अब्बास आफ्रिदी यांची जोडी जमलेली दिसली, परंतु आयर्लंडकडून विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले. पाकिस्तानवर दडपण निर्माण करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने सुरू होते. १२ धावा हव्या असताना अब्बासने ( १७) षटकारासाठी फटका खेचला, परंतु सीमारेषेवर त्याचा झेल टिपला गेला. पण, शाहीन आफ्रिदीने षटकार खेचून दडपण कमी केले. पुढच्या चेंडूवर स्लीपमध्ये शाहीनचा झेल सुटला. शाहीनने आणखी एक षटकार खेचून पाकिस्तानचा विजय पक्का केला. बाबर ३२ धावांव, तर शाहीन १३ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानने १८.५ षटकांत ७ बाद १११ धावा केल्या.