PAK vs IRE Match Updates : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ मध्ये आतापर्यंत चार संघांनी जागा मिळवली आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी ३-३ सामने जिंकले आहेत. भारत आणि पाकिस्तान अ गटात आहे. पाकिस्तानचा साखळी फेरीतील अखेरचा सामना रविवारी आयर्लंडसोबत होणार आहे. विश्वचषकातील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत शेजाऱ्यांना हा सामना जिंकावा लागेल. याशिवाय इतर काही संघांवर अवलंबून राहावे लागेल. त्यांनी तीनपैकी दोन सामने गमावले आहेत. पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील लढत फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र, १६ तारखेला होत असलेल्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढल्याचे दिसते.
पाकिस्तानचा शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्हीही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळेल. असे झाल्यास पाकिस्तान स्पर्धेबाहेर होईल आणि अमेरिका अ गटातून सुपर-८ मध्ये प्रवेश करणारा दुसरा संंघ ठरेल. लक्षणीय बाब म्हणजे फ्लोरिडा येथे या आठवड्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खासकरून अमेरिका विरूद्ध आयर्लंड आणि आयर्लंड विरूद्ध पाकिस्तान यांच्या सामन्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. सामन्याच्या ठिकाणी फ्लोरिडा येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, अ गटातून भारतीय संघाने सुपर-८ मध्ये स्थान मिळवले आहे. तर अमेरिका तीन सामन्यांपैकी दोन विजयासह ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्हीही संघांचा अखेरचा सामना आयर्लंडविरूद्ध होणार आहे. पाकिस्तानला सुपर-८ मध्ये जागा मिळवण्यासाठी शेवटचा सामना चांगल्या फरकाने जिंकावा लागेल. याशिवाय अमेरिकेचा मोठ्या फरकाने पराभव होईल अशी प्रार्थना करावी लागेल.