T20 World Cup 2024 PAK vs USA Live : पाकिस्तान संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेने विजयासाठी संघर्ष करायला लावला. यजमान अमेरिकेने सर्वोत्तम सांघिक कामगिरी करून पाकिस्तानवर संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवले. पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्यामुळे अमेरिकेचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी शेवटच्या षटकापर्यंत कडवी टक्कर दिली. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची फौज असलेल्या पाकिस्तानला यजमानांनी आरसा दाखवला. पण, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शेवटच्या तीन षटकांत सामना फिरवला होता आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मिळाल्याने सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्ये गेला.
नोस्तुश केंजिगे ( २-३०), मुळचा मुंबईचा सौरभ नेत्रावळकर ( २-१८), अली खान ( १-३०) व जसदीप सिंग ( १-३७) यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांची कोंडी केली. ३ बाद २६ अशा अवस्थेतून पाकिस्तानला बाबर आजम व शादाब खान यांनी सावरले. त्यांनी ४८ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी केली. शादाब २५ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ४० धावांवर बाद झाला. बाबरने ४३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४४ धावा केल्या. इफ्तिखार अहमदच्या १८ आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या नाबाद २२ धावांमुळे पाकिस्तान ७ बाद १५९ धावांपर्यंत कसाबसा पोहोचला.
पाकिस्तान संघाने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात गचाळपणा दाखवला आणि अमेरिकेच्या ओपनर्सचा आत्मविश्वास वाढला. स्टीव्हन टेलर व मोनांक पटेल यांनी पाकिस्तानच्या घातक गोलंदाजांची हवा काढून टाकली. नसीम शाहने सहाव्या षटकात पाकिस्तानला पहिले यश मिळवून देताना टेलरला ( १२) झेलबाद केले. नसीमच्या पुढच्याच चेंडूवर अँड्रीस गौसचा स्लीपमध्ये झेल उडाला, पंरतु त्याने खेळाडूपर्यंत पोहोचण्यापूर्वीच टप्पा खाल्ला. मोनांक आणि गौस यांनी आत्मविश्वासाने खेळ करून पाकिस्तानच्या मनोबलाचे खच्चीकरण सुरू केले. अमेरिकेने पहिल्या १० षटकांत १ बाद ७६ धावा केल्या आणि त्यांना विजयासाठी ८४ धावा हव्या होत्या.
विकेट घेण्यासाठी पाकिस्तानने शाहीनला पुन्हा गोलंदाजीला आणले, परंतु अमेरिकेचा कर्णधार मोनांकने त्याचे चौकार-षटकाराने स्वागत करून ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हॅरिस रौफने पाकिस्तानला महत्त्वाची विकेट मिळवून देताना गौसला ( ३५) बाद केले आणि ६८ धावांची भागीदारी तोडली. मोहम्मद आमीरने पुढच्या षटकात अमेरिकेचा आणखी एक सेट फलंदाज मुळच्या गुजरातच्या मोनांकला बाद केले. पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्नात मोनांकच्या बॅटची किनार घेत चेंडू सहज यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. मोनांक ३८ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५० धावांवर बाद झाला. आता ३० चेंडू ४५ धावा असा सामना चुरशीचा झाला.
शाहीन आफ्रिदीने १८व्या षटकात ७ धावा दिल्या आणि मोहम्मद आमीरने १९व्या षटकात फक्त ६ धावा दिल्या. त्यामुळे शेवटच्या षटकांत १५ धावा अमेरिकेला हव्या होत्या. नितीश कुमार व आरोन जोन्स यांनी अमेरिकेला आशेचा किरण दाखवला. ३ चेंडूंत १२ धावा हव्या असताना जोन्सने खणखणीत षटकार खेचला. पण, पुढच्या चेंडूवर १ धाव घेऊन जोन्सने चूक केली आणि नितीशने चौकार खेचून सुपर ओव्हरमध्ये सामना नेला. अमेरिकेने ३ बाद १५९ धावा करून सामना बरोबरीत आणला.
Web Title: T20 World Cup 2024 PAK vs USA Live : IT'S A SUPER OVER BETWEEN USA AND PAKISTAN, with Nitish Kumar pulling a boundary off the last ball to level the match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.